टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर थरारक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून आज भारत स्पर्धेतील दुसरा सामना खेळणार आहे. तुलनेने दुबळ्या असलेल्या नेदरलँड्सच्या संघाविरुद्धचा सामना दुपारी साडेबारा वाजता सुरु होणार आहे. ‘अव्वल १२’ फेरीच्या या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक वेळ घालवण्याची उत्तम संधी आहे. तर पाकिस्तानविरुद्ध एकटाच्या जीवावर विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीकडेही एक विक्रम करण्याची संधी आहे.
नक्की वाचा >> Ind vs Ned: मैदानात उतरण्याआधीच छोट्या नेदरलँड्सची ‘विराट’ अपेक्षा; कर्णधार एडवर्डस म्हणाला, “त्या दिवशी विराटने…”
टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अगदी शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं अन् भारतात दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली. रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) ९० हजारहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या सामन्यात कोहलीने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारला. कोहली फॉर्ममध्ये परतणं ही भारतासाठी समाधानकारक बाब आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच विराटने आजच्या सामन्यात खेळी केली तर तो एका विक्रमाला गवसणी घालू शकतो.
पाकिस्तानविरुद्ध ८२ धावा कुटणाऱ्या विराटने आजच्या सामन्यामध्ये ९० धावा केल्या तर एक अनोखा विक्रम त्याच्या नावावर होईल. विराटने नेदरलँड्सविरुद्ध ९० धावा केल्या तर तो टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरले. सध्या विराटच्या नावावर ९२७ धावा आहेत. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर त्याहून अधिक ३८ धावा असणारा वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल ९६५ धावांसहीत दुसऱ्या स्थानी आहे.
नक्की वाचा >> Ind vs Ned: सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणारा गोलंदाज अन् ‘हा’ सलामीवीर ठरु शकतो भारतासाठी डोकेदुखी
सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या या यादीमध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने पहिल्या स्थानी असून त्याच्या नावावर टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये एक हजार १६ धावा आहेत. त्यामुळेच एक हजार १७ धावा करण्यासाठी आणि या यादीत या दोन माजी फलंदाजांना मागे टाकण्यासाठी विराटला आज ९० धावांची गरज आहे. जरी त्याला आज या धावा करता आल्या नाहीत तरी त्याचा फॉर्म पाहता तो या विश्वचषक स्पर्धेत हा विक्रम स्वत:च्या नावे करेल अशी खात्री त्याच्या चाहत्यांना आहे.