भारतीय संघाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकली असून आता संघाच्या नजरा क्लीन स्वीपवर लागल्या आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आता अशा खेळाडूंना संधी देऊ इच्छितो ज्यांना आतापर्यंत खेळण्याची संधी मिळाली नाही. कर्णधार झाल्यानंतर रोहितची ही पहिलीच मालिका आहे. विवारी होणाऱ्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट लढतीमध्ये विजय मिळवून मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे.

रोहित शर्माने ईडन गार्डन्सवरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६४ धावा केल्या होत्या आणि कर्णधार म्हणून येथे पहिली मालिका ३-० ने जिंकण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. अशा शानदार विजयानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडला त्याच्या नव्या भूमिकेशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आठवडाभरात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होणार आहे. रोहित आणि द्रविडला आता राखीव खेळाडूंना संधी देऊन चाचणी करायची आहे. सहाव्या गोलंदाजाची निवड झाल्यास, व्यंकटेश अय्यरला गोलंदाजी देण्यात येईल. ऋतुराज गायकवाड, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि इशान किशन यांना या सामन्यात रोहित शर्मा संधी देईल, अशी आशा आहे.

पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने पाच गडी राखून अखेरच्या षटकात विजय मिळवला, तर दुसऱ्या लढतीत पदार्पणवीर हर्षल पटेलची प्रभावी गोलंदाजी आणि रोहित-के. एल. राहुल यांच्या अर्धशतकांमुळे भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे आता रोहितसाठी फलदायी मानल्या जाणाऱ्या कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत विजयी हॅट्ट्रिक साकारणार का, हे पाहणे रंजक ठरेल. न्यूझीलंड मात्र किमान प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

न्यूझीलंडविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज.