India Vs Pakistan Asia Cup 2022: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली मागील काही सामन्यांमध्ये सातत्याने वाईट खेळी दाखवत असल्याने सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाला होता. आपल्याला आपल्या खेळाचा दर्जा माहित असल्याने या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत आहे असेही कोहलीने एका मुलखातीत सांगितले. कोहलीने नुकताच माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्यासोबतचा एक फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आपली पार्टनरशिप माझ्यासाठी कायम खास असेल असे म्हणत विराटने भावनिक कॅप्शन दिले होते. हा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

कोहलीने २००८ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१४ मध्ये धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीने भारताचे कसोटी कर्णधारपद स्वीकारले. कोहली आणि धोनी ही पार्टनरशिप आजवर नेहमीच गाजली होती. कोहलीने सुद्धा पोस्ट मध्ये याचा उल्लेख करत, “या व्यक्तीचा विश्वासू डेप्युटी असणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंददायी आणि रोमांचक काळ होता. आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल ७+१८”,असे कॅप्शन दिले आहे.

विराटला कॅप्टन कूलची आठवण

आजवरचे रेकॉर्ड पाहिल्यास धोनी आणि कोहली या दोघांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक विजय आपल्या नावे केले आहेत. धोनीने भारताला २००७ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत, २०११ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक, त्यानंतर २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली तर कसोटी सामन्यांमध्ये भारताला एक प्रबळ संघ बनवण्यात कोहलीचे मोठे योगदान आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ४० तर एकदिवसीय फॉर्मेटमध्ये ६५ विजयी सामने खेळले आहेत.

IND vs PAK T20 Asia Cup 2022: शेन वॉटसनचं भाकीत खरं ठरणार? म्हणाला, भारत विरुद्ध सामन्यात पाकिस्तानला पूर्ण विश्वास की…

दरम्यान, अलीकडे काही सामन्यांमध्ये विराटचा फॉर्म बिघडल्याने भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या समाप्तीनंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती. आगामी आशिया चषक २०२२ मध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुनरागमन करणार आहे. पाकिस्तान विरुद्ध सामन्यात २८ ऑगस्टला विराट पुन्हा आपली आक्रमक खेळी दाखवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.