द्विपक्षीय कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाक क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडून नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी दाखल केलेली याचिका, आयसीसीच्या तंटा निवारण लवादाने नुकतीच फेटाळून लावली आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानचा दौरा करावा यासाठी प्रयत्नात आहे. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या मते, भारत-पाक क्रिकेट मालिकेला अॅशेस मालिकेपेक्षाही अधिक महत्व आहे. NDTV वृत्तवाहिनीशी बोलत असताना शाहीदने आपलं मत मांडलं.

“इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या अॅशेस मालिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. या दोन देशांमधलं द्वंद्व हे सर्वांना सुपरिचीत आहे. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातली 5 कसोटी सामन्यांची मालिका ही अॅशेस मालिकेपेक्षा अधिक रंगतदार होईल.”

समालोचक आणि माजी खेळाडू रमीझ राजा यांनी शाहीद आफ्रिदीच्या मताशी सहमती दर्शवली. “भारताविरुद्ध खेळण्याआधी पाकिस्तानच्या संघाला आधी आपल्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे. भारत-पाक सामन्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असतो. जर तुम्हाला कसोटी क्रिकेट टिकवून ठेवायचं असेल तर भारत-पाक देशांनी कसोटी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे.” त्यामुळे भविष्यकाळात भारत-पाक सामन्यांबद्दल दोन्ही क्रिकेट बोर्ड काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.