भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने दुसऱ्या डावात २६६ धावांची खेळी केली. मात्र दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या डावातील २७ धावांची आघाडी होती. त्यामुळे २३९ धावा झाल्या आणि विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलं आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तर दक्षिण अफ्रिका हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २०२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिका संघाने सर्वबाद २२९ धावा केल्या आणि २७ धावांचा लीड घेतला. दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा २ गडी गमवून ८५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. चेतेश्वर पुजाराला दुसऱ्या डावात अखेर सूर गवसला. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतील त्याचं ३२ वं अर्धशतक आहे. त्यानंतर लगेचच अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी शतकी भागीदारी केली आहे. या दोघांची भागीदारी फोडण्यात कागिसो रबाडाला यश आलं. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा त्याच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. तीन चेंडू खेळून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. आर. अश्विन आणि हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर अश्विन झेलबाद झाला. आर. अश्विन १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकुरने झटपट खेळी करत २४ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. मात्र मार्को जॅनसेनच्या गोलंदाजीवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद शमी खातंही खोलू शकला नाही. मार्कोच्या गोलंदाजीवर बाद झाला. जसप्रीत बुमराहच्या रुपाने भारताना नववा धक्का बसला आहे. जसप्रती बुमराहने १४ चेंडूत ७ धावा केल्या. यात एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद सिराजही खातं खोलू शकला नाही. तर हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला.

भारतीय संघ- केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर. अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दक्षिण अफ्रिकेचा संघ- डीन एल्गर, एडन मारक्रमस किगन पीटरसन, रस्सी वॅन दर दुस्सेन, टेम्बा बवुमा, कायल वेरेयन, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, ड्युअन ऑलिविअर, लुंगी एनगिडी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs south africa 2nd test 3rd day match update rmt
First published on: 05-01-2022 at 13:25 IST