टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली. या दौऱ्याबाबत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने मत व्यक्त केली.

“भारतीय संघ फिरकी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररत्रण या चारही विभागात आमच्या दोन पावलं पुढे होता. भारतीय संघाला कोणीही सहजासहजी हरवू शकत नाही. २०१५ नंतर भारतीय खेळपट्ट्यांवर खेळणे म्हणजे फिरकी गोलंदाजीविरोधात खेळण्याचा सराव करणे अशी आमची विचारसरणी होती, पण या दौऱ्यात अगदी उलट झाले. या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी पोषक ठरल्या. तीच आमची चूक झाली”, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने सांगितले.

“पहिल्या सामन्यात आम्ही ४३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र आमच्या संघाची जी अवस्था झाली ती अत्यंत विचित्र होती. सामन्यात असे अनेक क्षण होते, जेव्हा सामन्यात काहीही घडू शकलं असतं. पण त्या सगळ्या संधी आम्ही गमावल्या. सामन्यागणिक आमच्या चुका वाढतच गेल्या. भारतीय संघानेही त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. त्यामुळे त्यांना विजयाचे श्रेय नक्कीच द्यायला हवे. त्यांच्याकडून आम्हाला खुप काही शिकायला मिळाले”, असेही तो म्हणाला.

“भारतीय खेळपट्ट्यांवर योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे हे कौशल्य आहे. भारतीय गोलंदाजांनी ते चांगलेच जमवले. आमच्यासाठी सकारात्मक बाब म्हणजे आमच्या संघातील काही युवा खेळाडूंना चांगला अनुभव मिळाला.आमच्यासाठी हा सर्वात कठीण दौरा होता”, असेही डु प्लेसिसने नमूद केले.