भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज निर्णायक सामना
श्रीलंकेकडून झालेला मानहानीकारक पराभव, हताश संघ आणि खचलेली मानसिकता, या दुष्टचक्रातून बाहेर पडून भारतीय संघाला स्पर्धेतील आव्हान टिकवण्याची रविवारी अखेरची संधी असेल. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई पाहायला मिळेले. दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे, कारण हा सामना जिंकला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहील, अन्यथा संघांना आपली वळकटी उचलून मायदेशी निघावे लागेल. ‘चोकर्स’ या नावाने दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रसिद्ध आहे, पण हा शिक्का कर्णधर एबी डी’व्हिलियर्स पुसणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. त्यामुळे पराभवाच्या राखेतून उभारी घेऊन कोणता संघ फिनिक्स पक्ष्यासारखा भरारी घेतो, हे पाहणे सर्वात उत्सुकतेचे ठरणार आहे.
स्पर्धेपूर्वी भारतीय संघ हा प्रबळ दावेदार वाटत होता. भारताची गोलंदाजी ही सर्वात भेदक वाटत होती. पण श्रीलंकेने भारताची गोलंदाजी बोथट असल्याचे दाखवून दिले. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाला गेल्या सामन्यात अचूक मारा करता आला नाही. फिरकीपटू रवींद्र जडेजालाही चांगली फिरकी गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजीमध्ये काही बदल होणे अपेक्षित आहे. जडेजाच्याऐवजी आर. अश्विनला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात तीन डावखुरे फलंदाज असल्यामुळे अश्विन या सामन्यात प्रभावी ठरू शकतो. फलंदाजीमध्ये मात्र कोणताही बदल होणार नाही. कारण रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सातत्यपूर्ण फलंदाजी करत आहेत. कर्णधार विराट कोहलीला अधिक मेहनत घ्यायची गरज आहे. त्याचबरोबर दडपणाखाली कसे नेतृत्व करायला हवे, हे कोहलीने अजूनही शिकण्याची गरज आहे. युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी हे मधल्या फळीत कशी कामगिरी करतात यावर संघाची धावगती अवलंबून असेल.
दक्षिण आफ्रिकेला गेल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्यावरही हा सामना जिंकण्याचे प्रचंड दडपण असेल. डी’व्हिलियर्स, हशिम अमला, क्विंटन डी’कॉक, फॅफ डय़ू प्लेसिस, जेपी डय़ुमिनी, डेव्हिड मिलर, असे एकामागून एक दमदार फलंदाज त्यांच्याकडे आहेत, पण एकाही फलंदाजाला अजूनही छाप पाडता आलेली नाही. खासकरून डी’व्हिलियर्सकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत, पण त्याला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये मॉर्नी मॉर्केल, कागिसो रबाडा आणि इम्रान ताहिर यांच्यापुढे भारताच्या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना कमी धावांत रोखण्याचे आव्हान असेल.
दोन्ही संघांना गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. या पराभवातून शिकून नव्या उमेदीने ते कसे मैदानात उतरतात, यावर निकाल ठरू शकतो. दोन्ही संघ हे चांगलेच तुल्यबळ आहेत. फक्त योग्यप्रकारे जो संघ दडपण हाताळेल त्याच्याच गळ्यात विजयाची माळ पडेल.
कोहलीचा लाल चेंडूने सराव
लंडन : सध्याच्या घडीला भारतीय संघात सर्वात जास्त दडपण असेल ते कर्णधार विराट कोहलीवर. पण तरीही फलंदाजीमध्ये वेगवेगळे प्रयोग तो करताना दिसत आहे. रविवारच्या सामन्यापूर्वी सराव करताना कोहलीने लाल चेंडूने सराव करत सर्वानाच आश्यर्चाचा धक्का दिला. सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाचा चेंडू वापरला जातो. पण कोहलीने स्विंग झालेल्या चेंडूंचा समर्थपणे सामना करण्यासाठी हा प्रयोग केल्याचे म्हटले जात आहे. कोहलीने सरावादरम्यान उजव्या यष्टीबाहेरील चेंडूचा अधिक सामना केला.
प्रतिस्पर्धी संघ
- भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन.
- दक्षिण आफ्रिका : एबी डी’व्हिलियर्स (कर्णधार), हशिम अमला, फरहान बेहरादिन, क्विंटन डी’कॉक, जेपी डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहिर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वेन पार्नेल, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, अँडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस.