कर्णधार डीन एल्गरच्या झुंजार आणि नाबाद ९६ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गच्या मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताला ७ गड्यांनी मात दिली. सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकेने भारताच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. चौथ्या दिवशी आफ्रिकेला विजयासाठी १२२ धावांची आवश्यकता होती. सुरुवातीची दोन सत्रे पावसामुळे वाया गेली. तिसऱ्या सत्रात ३४ षटकांचा खेळ होणार असल्याची घोषणा करण्यात आली.डीन एल्गर आणि रुसी व्हॅन डर ड्युसेन यांनी आज फलंदाजीला सुरुवात केली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ड्युसेनला माघारी धाडले, पण त्यानंतर टेम्बा बावुमासोबत एल्गरने भागीदारी रचत विजयावर शिक्कामोर्तब केले. एल्गरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव

दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आफ्रिकेने ४० षटकांत २ बाद ११८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरने एडिन मार्करमला (३१), तर रविचंद्रन अश्विनने कीगन पीटरसनला (२८) पायचीत पकडले.चौथ्या दिवशी एल्गर आणि ड्युसेन यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. मोहम्मद शमीने ड्युसेनला पुजाराकरवी झेलबाद केले. ड्युसेनने ५ चौकारांसह ४० धावा केल्या. त्यानंतर एल्गरने टेम्बा बावुमासोबत भागीदारी रचली. एल्गरने १० चौकारांसह नाबाद ९६ तरर बावुमाने नाबाद २३ धावा केल्या. या मैदानावर मागील सहा सामन्यात भारताचा हा पहिला पराभव आहे. तर आफ्रिकेने पहिल्यांदाच या मैदानावर भारताला हरवले.

हेही वाचा – IND vs SA : ऐकलं का..! ४४ वर्षीय पालेकर यांचं पदार्पण; अंपायर आफ्रिकेचे, पण जन्म महाराष्ट्रातील…

तत्पूर्वी, भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावांवरून पुढे खेळताना रहाणे-पुजारा यांनी सर्वस्व पणाला लावले. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १११ धावांची भागीदारी रचून संघाची आघाडी १५० धावांपर्यंत नेली. दोघांनीही नेहमीच्या शैलीत फक्त बचावावर भर न देता चौकार वसूल करण्याबरोबरच एकेरी-दुहेरी धावा काढल्या. पुजाराने कारकिर्दीतील ३२वे, तर रहाणेने २५वे अर्धशतक साकारले. कगिसो रबाडाने दोन षटकांच्या अंतरात अनुक्रमे रहाणे आणि पुजाराला माघारी पाठवले. तर ऋषभ पंत भोपळाही फोडू शकला नाही. रविचंद्रन अश्विनही (१६) फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यामुळे भारताची ६ बाद १८४ अशी अवस्था झाली. अशा वेळी मुंबईकर शार्दूल पुन्हा संघासाठी धावून आला. शार्दूलने अवघ्या २४ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह २८ धावा फटकावल्या. तो बाद झाल्यावर हनुमा विहारीने (नाबाद ४०) तळाच्या फलंदाजांच्या साथीने संघाला २६६ धावांपर्यंत पोहोचवले. आफ्रिककेडून रबाडा, एनगिडी यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

  • भारत (पहिला डाव) : सर्वबाद २०२ धावा
  • दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : सर्वबाद २२९ धावा
  • भारत (दुसरा डाव) : ६०.१ षटकांत सर्व बाद २६६ (अजिंक्य रहाणे ५८, चेतेश्वर पुजारा ५३; लुंगी एनगिडी ३/४३, कगिसो रबाडा ३/७७)
  • दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ६७.४ षटकांत ३ बाद २४३ (डीन एल्गर नाबाद ९६, रुसी व्हॅन डर ड्युसेन ४० ; रवीचंद्रन अश्विन १/२६)