दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी मालिकेत भारताने तिसऱ्या दिवशी सामन्यावरील पकड अधिक मजबूत केली. २ बाद ९ या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. त्यामुळे ३३५ धावांची आघाडी घेणाऱ्या विराटच्या टीम इंडियाने आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला. पहिल्या डावात कागिसो रबाडा फलंदाजी करत होता. त्यावेळी फलंदाजाने चेंडू टोलवला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. उमेश यादवने मैदानावर झोपून चेंडू अडवला आणि लगेचच चेंडू स्टंपवर फेकला. त्यावेळी त्याने फेकलेला चेंडू स्टंपवर लागला आणि रबाडा बाद झाला.
Umesh Yadav hits the bullseye https://t.co/G2dGLWx4P8 via @bcci
— Viraj B. (@VirajB1) October 21, 2019
दरम्यान, २ बाद ९ या धावसंख्येवरून खेळताना आफ्रिकेने पहिल्या सत्रात ४ तर दुसऱ्या सत्रात ४ गडी गमावले. आफ्रिकेचा कर्णधार पहिल्या डावात अपयशी ठरला. ९ चेंडूत १ धाव काढून तो बाद झाला. उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ३ बाद १६ अशी झाली होती. त्यानंतर मात्र भारताला गडी बाद करण्यासाठी काही काळ झगडावे लागले.
दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. पण ६२ धावांवर तो बाद झाला. त्याने १० चौकार आणि १ षटकार ठोकला. पाठोपाठ ३२ धावा काढून बावुमाही बाद झाला. कसोटी पदार्पण करणारा हेन्रीक क्लासें स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे पहिल्या सत्राच्या शेवटी आफ्रिकेची अवस्था ६ बाद १२९ धावा केल्या. जॉर्ज लिंड (३७) याने काही काळ संघर्ष केला. पण त्याला तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला ३३५ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात उमेश यादवने ३ बळी तर मोहम्मद शमी, शाहबाज नदीम व रवींद्र जाडेजाने २-२ बळी टिपले.