श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर लोकेश राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. श्रीलंकेच्या लकमलने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात कसोटी सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद होणारा लोकेश राहुल हा सहावा भारतीय सलामीवीर आहे. यापूर्वी लिटल मास्टर सुनील गावसकर, वासिम जाफर, सुधीर नाईक,  डब्लू व्ही रमण आणि शिव सुंदर दास हे भारतीय फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत. सुनील गावसकर तब्बल तीन वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. कोलकाताच्या मैदानात पहिल्या चेंडूवर बाद होणारा लोकेश राहुल तिसरा सलामीवीर आहे. यापूर्वी भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक आणि सुनील गावसकर ईडनगार्डनच्या मैदानावरच पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. या दोन्ही सलामवीरांना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी तंबूचा रस्ता दाखवला होता.

१९८३ वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाताच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात सुनील गावसकर मार्शलच्या गोलंदाजीवर बाद झाले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २४१ आणि दुसऱ्या डावात अवघ्या ९० धावा केल्या होत्या. भारताने हा सामना ४६ धावांनी गमावला होता. याशिवाय सुनिल गावसकर पाकिस्तानविरुद्ध इमरान खान आणि इंग्लंडविरुद्ध अॅरनॉल्डच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर बाद झाले.

ईडन गार्डनच्या मैदानावर १९७४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात सुधीर नाईक पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. रॉबर्ट्सने एका अप्रतिम चेंडूवर त्यांना यष्टीरक्षक मेरीकरवी झेलबाद केले होते. भारताने हा सामना ८५ धावांनी जिंकला होता. इतर फलंदाजांमध्ये शिव सुंदर दास हा वेस्ट इंडिजच्या डिलॉनचा बळी ठरला. तर जाफरला बांगलादेशच्या मोर्तुझाने पहिल्या चेंडूवर तंबूत धाडले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रमण यांना पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची वेळ आली होती.