भारताचा सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार शिखर धवनने वनडे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. धवनने वेस्ट इंडिजच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांना मागे टाकत वेगवान ६००० धावा केल्या आहेत. धवनने १४० डावात ही कामगिरी केली.  रिचर्ड्स आणि रूट यांनी वनडेत ६००० धावा करण्यासाठी १४१ डाव खेळले होते.

‘दादा’लाही टाकले मागे

धवनने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही मागे टाकले. गांगुलीने १४७ डावांत ६००० धावा केल्या होत्या. तर वनडेच्या १३६ डावात विराट कोहलीने ६००० धावा केल्या आहेत. वेगवान ६००० धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर आहे. अमलाने अवघ्या १२३ डावात ही कामगिरी केली होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने वनडेच्या १३९ डावात ६००० धावा केल्या आहेत. धवन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ६००० धावा करणारा जगातील चौथा क्रिकेटपटू बनला आहे.

 

 

हेही वाचा – यावेळी मेस्सीनं नव्हे, तर त्याच्या ‘या’ फोटोनं मोडलाय रेकॉर्ड!

श्रीलंकेविरुद्ध १००० धावा

श्रीलंकेविरुद्ध १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा शिखर धवन १३वा भारतीय फलंदाज ठरला आहे. ही त्याची खास कामगिरी आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर (३११३), एमएस धोनी (२३८२), विराट कोहली (२२२०), मोहम्मद अझरुद्दीन (१८३४), वीरेंद्र सेहवाग (१६९३), गौतम गंभीर (१६६८), रोहित शर्मा (१६६५), राहुल द्रविड (१६६२), सौरव गांगुली (१५३४), युवराज सिंग (१४००), सुरेश रैना (१२८२) यांचा समावेश आहे.