गुवाहाटी

भारताचा कर्णधार रोहित शर्मा अंगठय़ाच्या दुखापतीतून सावरला असून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल. रोहितला गेल्या काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला गुवाहाटी येथे होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर गवसतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

रोहितला गेल्या वर्षीच्या अखेरीस बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मात्र, अंगठय़ाला झालेल्या दुखापतीनंतरही त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि अर्धशतकही साकारले. परंतु त्यानंतर त्याला बांगलादेशविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना, कसोटी मालिका आणि श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकावे लागले. रोहितला गेल्या वर्षी आठ एकदिवसीय सामन्यांत केवळ तीन अर्धशतके करता आली. यंदा मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने  रोहितने आपला सर्वोत्तम खेळ करणे गरजेचे आहे. 

’ वेळ : दुपारी १.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार नाही -रोहित

भारतीय निवड समितीने भविष्याच्या दृष्टीने विचार करताना ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली नव्याने संघबांधणीला सुरुवात केली असली, तरी आपण ट्वेन्टी-२० प्रारूपातून निवृत्त होण्याबाबत विचार केलेला नसल्याचे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.

बुमरा एकदिवसीय मालिकेला मुकणार

गुवाहाटी : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे क्रिकेटच्या मैदानावरील पुनरागमन लांबणीवर गेले असून पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे तो मंगळवारपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या बुमराने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपला अखेरचा सामना खेळला होता. गोलंदाजीचा अपुरा सराव आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचे महत्त्व लक्षात घेता बुमराबाबत धोका न पत्करण्याचा भारतीय संघ व्यवस्थापन व ‘एनसीए’च्या वैद्यकीय पथकाने निर्णय घेतला आहे.