भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावर अनेक नवीन तारे उदयाला आले असले तरी ‘कॅप्टन कूल’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या धोनीची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. यष्टीरक्षणातील चपळता म्हणा किंवा बिकट परिस्थितीमध्येही कमालीच्या थंड डोक्याने खेळून आपल्याला ‘कॅप्टन कूल’ का म्हणतात, हे त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. भारत व श्रीलंका यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यादरम्यानही त्याने पुन्हा एकदा आपल्या याच ‘कूल’पणाचा प्रत्यय आणून दिला.

जेव्हा क्रिकेटचा ‘जबरा फॅन’ कॅप्टन कूलला भेटतो!

रोहीत शर्माने ठोकलेले शतक आणि त्याला महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी खेळी करुन दिलेली खंबीर साथ या जोरावर भारताने रविवारी तिसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेवर ६ गडी राखून मात केली. या विजयासह भारताने पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली. यापूर्वीच्या कसोटी मालिकेतही भारताने लंकेला अक्षरश: धूळ चारली होती. साहजिकच श्रीलंकन संघाच्या या कामगिरीवर तेथील क्रिकेट चाहते नाराज आहेत. अखेर, कालच्या सामन्यादरम्यान श्रीलंकन चाहत्यांच्या या संतापाचा कडेलोट झाला. भारताचा विजय जवळ आलेला पाहताच मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी पाण्याच्या बाटल्या फेकत आपला रोष व्यक्त केला. हा प्रकार पाहताच पंचांनी अर्ध्या तासासाठी खेळ थांबवला होता. या दरम्यान श्रीलंकन खेळाडू हताशपणे प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीकडे पाहत होते. तर मैदानात फलंदाजी करत असलेला रोहित शर्मा आणि धोनी यांच्याकडेही हा प्रकार थांबेपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा धोनीने नेहमीप्रमाणे सगळ्यांनाच आश्चर्यात टाकणारा एक प्रकार केला.

धोनीबाबतच्या वक्तव्यावरून एमएसके प्रसाद टीकेचे धनी

प्रेक्षकांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करत धोनी सरळ मैदानात आडवा झाला आणि चक्क झोपून गेला. साहजिकच त्याच्या या कृतीमुळे थोड्यावेळासाठी सामन्याच्या समालोचकांसह अनेकजणांना काय बोलावे, हेच सूचत नव्हते. अखेर पंधरा मिनिटांनी प्रेक्षकांची हुल्लडबाजी थांबली आणि धोनी निद्रिस्त अवस्थेतून बाहेर आला. यानंतर भारताने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या विजयासह भारताने वन-डे मालिकादेखील ३-० अशी खिशात घातली. मात्र, या सामन्यानंतर विजयाऐवजी सगळीकडे धोनीच्या या ‘पॉवर नॅपची’ प्रचंड चर्चा रंगली होती.