तिसऱ्या सामन्यात भारताची १७ धावांनी सरशी; मुंबईकर सूर्यकुमार चमकला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाता :कलात्मक आणि आगळय़ावेगळय़ा फटक्यांसह मुंबईकर सूर्यकुमार यादवने (३१ चेंडूंत ६५ धावा) साकारलेल्या अर्धशतकामुळे भारताने रविवारी तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजवर १७ धावांनी सरशी साधली. या विजयासह भारताने या मालिकेवर ३-० असे वर्चस्व गाजवले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा भारताचा निर्भेळ यशासह सलग तिसरा मालिकाविजय ठरला.

कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला २० षटकांत ९ बाद १६७ धावाच करता आल्या. रोहितच्या नेतृत्वाखालील भारताने मागील वर्षीच्या अखेरीस घरच्या मैदानावरील ट्वेन्टी-२० मालिकेत न्यूझीलंडला ३-० अशी धूळ चारली. त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादले. सूर्यकुमारने सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा बहुमान पटकावला.

तिसऱ्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर भारताने २० षटकांत ५ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली. या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला सलामीला संधी मिळाली. मात्र, केवळ चार धावा करून तो जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर इशान किशन (३४) आणि श्रेयस अय्यर (२५) यांनी ५३ धावांची भागीदारी रचली.

मात्र, या दोघांसह चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार रोहित (७) काही धावांच्या अंतराने माघारी परतल्याने भारताची १३.५ षटकांत ४ बाद ९३ अशी स्थिती झाली. मग सूर्यकुमार आणि वेंकटेश अय्यर यांनी षटकार-चौकारांची आतषबाजी करत सहा षटकांतच ९१ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील चौथे अर्धशतक झळकावताना ३१ चेंडूंत एक चौकार आणि तब्बल सात षटकारांच्या साहाय्याने ६५ धावांची खेळी केली. त्याला वेंकटेशने १९ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३५ धावा करत तोलामोलाची साथ दिली.

१८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या बाजूने डावखुऱ्या निकोलस पूरनने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने ४७ चेंडूंत ६१ धावांची खेळी करताना या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक साकारले. मात्र, त्याला रोमारियो शेफर्ड (२९) आणि रोव्हमन पॉवेल (२५) यांचा अपवाद वगळता त्याला इतरांची फारशी साथ लाभली नाही. त्यामुळे विंडीजला २० षटकांत ९ बाद १६७ धावाच करता आल्या. ट्वेन्टी-२० प्रकारात विंडीजचा हा ८३वा पराभव आहे. 

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ५ बाद १८४ (सूर्यकुमार यादव ६५, वेंकटेश अय्यर नाबाद ३५; रॉस्टन चेस १/२३) विजयी वि. वेस्ट इंडिज : २० षटकांत ९ बाद १६७ (निकोलस पूरन ६१, रोमारियो शेफर्ड २९; हर्षल पटेल ३/२२, दीपक चहर २/१५)

’ सामनावीर आणि मालिकावीर : सूर्यकुमार यादव

मला माझ्या फलंदाजीवर विश्वास आहे. त्यामुळे मी नेहमीच कलात्मक फटके खेळण्यावर भर देतो. दडपणाच्या परिस्थितीत संघाला सावरल्याचे समाधान आहे. वेंकटेशने दुसऱ्या बाजूने उत्तम साथ दिली. आता श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मी उत्सुक आहे.

– सूर्यकुमार यादव

या मालिकेतील सलग तिसऱ्या विजयासह भारतीय संघाने ‘आयसीसी’च्या जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केले आहे.

भारताने सलग नववा ट्वेन्टी-२० सामना जिंकण्याचा पराक्रम केला. विश्वचषकात अखेरचे तीन साखळी सामने आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन लढती भारताने जिंकल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs west indies 3rd t20i india beat west indies by 17 runs to sweep the series 3 0 zws
First published on: 21-02-2022 at 01:30 IST