अहमदाबाद : भारतीय संघ यापूर्वी मायदेशात खेळताना फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्यास प्राधान्य द्यायचा. मात्र, आमचा विचार जरा वेगळा आहे. यापुढे फलंदाज आणि गोलंदाजांस समान संधी असणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळण्यास आमची पसंती असेल, अशी प्रतिक्रिया कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केली.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हिरवीगार खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. उष्ण आणि दमट वातावरणात अतिरिक्त गवत असलेली खेळपट्टी आम्हाला तिसरा वेगवान गोलंदाज खेळविण्याच्या मोहात पाडू शकते, असे सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत गिल म्हणाला.

‘‘आमची (संघ व्यवस्थापन) नक्की काय चर्चा झाली याबद्दल मी बोलू शकत नाही. परंतु, फलंदाजी आणि गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्याचा आम्ही यापुढे प्रयत्न करणार आहोत,’’ असे गिलने सांगितले.

‘‘भारतात खेळताना प्रतिस्पर्धी संघासाठी फिरकी आणि रिव्हर्स स्विंगचे मोठे आव्हान असते. आपल्याकडे कसोटी सामने अभावानेच पाच दिवस चालले आहेत. मात्र, आता प्रदीर्घ चालतील असे सामने खेळण्यासाठी आणि दर्जेदार कामगिरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ असे गिलने स्पष्ट केले.

आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेनंतर कसोटी क्रिकेटशी जुळवून घेण्यासाठी खूप कमी वेळ मिळाल्याचे मान्य करून गिल म्हणाला, ‘‘एका प्रारूपातून दुसऱ्या प्रारूपात खेळणे हे सर्व मानसिकतेवर अवलंबून असते. आम्हाला सरावासाठी फार संधी मिळाली नाही हे खरेच आहे. आता बचावाचे तंत्र अचूक राखण्यावर आणि योग्य नियोजनासह खेळण्यावर माझा भर राहील.’’

संघरचनेबाबत स्पष्ट मत करणे गिलने टाळले. ‘‘जसप्रीत बुमरा दोनही सामने खेळणार की नाही, हे पहिला कसोटी सामना किती वेळ चालतो आणि आमचे वेगवान गोलंदाज किती षटके टाकतात यावर अवलंबून असेल,’’ असे गिलने सांगितले. रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावरच खेळणार असल्याचे त्याने नमूद केले. ‘‘गेल्या दोन वर्षांत जडेजा चांगल्या लयीत आहे. त्याने आम्हाला अनेकदा कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. त्याच्याकडे खूप अनुभव आहे आणि त्याची कामगिरी आमच्यासाठी निर्णायक ठरू शकेल,’’ असे गिल म्हणाला.

न्यूझीलंडचे अनुकरण करण्याचा प्रयत्न

चेस कसोटी किकेटमध्ये वेस्ट इंडिज संघाचा दर्जा सध्या खालावला ही नाकारून चालणार नाही. मात्र, तरी आम्ही गेल्या हंगामात न्यूझीलंडने ज्या प्रकारे भारतावर वर्चस्व राखले, त्याचेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करू, असे वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेस म्हणाला. गेल्या वर्षी न्यूझीलंडने भारतातील कसोटी मालिका ३-० अशी जिंकली होती. ‘‘आम्ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खूप मागे आहोत. आमचा दर्जाही उंचावलेला नाही. आम्हाला यातून बाहेर पडावे लागेल. आम्हाला जिंकण्याच्या मानसिकतेने खेळावे लागले. संघ म्हणून एकत्र राहावे लागेल. भारतात खेळणे आव्हानात्मक असेल. खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक या सर्वांना एकमेकांना पाठिंबा देऊन मनोबल उंचवावे लागेल,’’ असेही चेस म्हणाला.