वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या मानधन वादाचा सध्या सुरू असलेल्या दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे.
‘‘भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील क्रिकेट मालिकेला कोणताही धोका नाही, हे सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो. सर्व सामने नियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसार होतील. माझे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांशीही बोलणे झाले आहे आणि त्यांनी मला या दौऱ्यात कोणताही अडथळा येणार नाही, याची खात्री दिली आहे,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
‘‘२००७-०८ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या भविष्यातील दौऱ्यांच्या कार्यक्रमानुसार हा दौरा होत आहे. यात तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामन्याचा समावेश आहे. ही मालिका व्यवस्थितपणे व्हावी, हे आमच्यापुढील महत्त्वाचे आव्हान असेल,’’ असे पटेल यांनी सांगितले. ही मालिका संपल्यावर वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचा वाद मिटवण्यासाठी आम्ही मध्यस्थाची भूमिका पार पाडू शकू, असे ते पुढे म्हणाले.
कोची येथील पहिला एकदिवसीय सामना सुरळीतपणे पार पडावा याकरिता बीसीसीआयने वेस्ट इंडिजचे खेळाडू किंवा वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला मानधन दिल्याच्या वृत्ताचा संजय पटेल यांनी इन्कार केला. ते म्हणाले, ‘‘या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. बीसीसीआयने अशा प्रकारे कुणालाही मानधन दिलेले नाही. तो वेस्ट इंडिज मंडळाचा आणि खेळाडूंचा खासगी प्रश्न आहे. एक क्रिकेट म्हणून हा प्रश्न कसा मार्गी लावावा, याकरिता आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो.’’