राजकोट कसोटीत भारताने वेस्ट इंडिजवर १ डाव आणि २७२ धावांनी मात केली. या विजयासह २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडीही घेतली आहे. विंडिजविरुद्धचा हा कसोटी सामना भारताच्या अनेक खेळाडूंसाठी महत्वाचा ठरला. पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने शतकी खेळी केली, तर कर्णधार विराट कोहलीनेही २४ व्या कसोटी शतकाची नोंद करत अनेक विक्रम मोडीत काढले. यांच्यासोबतच भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजानेही आपलं कसोटीतलं पहिलं वहिलं शतक यावेळी साजरं केलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जाडेजाने आपलं हे शतक, आपण आपल्या आईला समर्पित करत असल्याचं म्हटलंय.

” मी भारताकडून खेळावं अशी माझ्या आईची इच्छा होती. ती आज माझ्यासोबत असती तर माझं हे शतक मी तिला भेट म्हणून दिलं असतं. तिच्यासाठी हे शतक सगळ्यात मौल्यवान ठरलं असतं, यासाठी मी हे शतक आईला समर्पित करतो आहे.” पत्रकारांशी संवाद साधताना जाडेजा बोलत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांपुढे विंडिजच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. कुलदीप यादव-रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनी विंडिजचा सगळा संघ १९१ धावांमध्ये माघारी धाडला. एक डाव २७२ धावांनी सामना जिंकत भारत सध्या मालिकेत आघाडीवर आहे, या मालिकेतला अखेरचा सामना १२ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होतोय.