भारतीय संघाने आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघाचा सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी मोलाची भूमिका बजावली. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पहिल्यांदाच जेतेपदासाठी अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. दरम्यान कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. त्यामुळे कोणताही संघ सहज विजय मिळवू देणार नाही, हे तर निश्चित आहे. पण वनडे क्रिकेटमधील दोन्ही संघांची कामगिरी पाहिली, तर दोन्ही संघ ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने २० सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला अवघ्या १३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.

साखळी फेरीत भारतीय संघाची कामगिरी

या स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दमदार सुरूवात केली होती. त्यानंतर पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर भारताला पुढील तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांनी भारतीय संघाला पराभूत केलं. पण त्यानंतर निर्णायक सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत केलं आणि सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. दरम्यान साखळी फेरीतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं.

दोन्ही संघांकडे पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी

भारतीय संघाने तिसऱ्यांदा महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी २००५ आणि २०१७ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत भारतीय संघाने प्रवेश मिळवला होता. पण दोन्ही वेळेस भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या दोन्ही संघांना आजवर एकदाही वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकता आलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघांकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

या स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ: हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, उमा छेत्री, शफाली वर्मा.

दक्षिण आफ्रिका: लॉरा वॉल्वार्ड्ट, आयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लार्क, मारिझान कप्प, तॅझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, ॲनिएरी डर्कसन, ॲनीके बॉश, मासाबाता क्लास, सुने लूस, कराबो मेसो, तुमी सेखुखुने, नॉन्ड्युमिसो शंगासे.