बासेटेरे (सेंट किट्स) : पहिल्या सामन्यातील दमदार विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्यांचे कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने पहिल्या सामन्यात यजमान विंडीजला ६८ धावांनी धूळ चारत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. या सामन्यात भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये दर्जेदार खेळ केला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही या कामगिरीची पुनरावृत्ती करत सलग दुसरा विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील विंडीजचा संघ दमदार पुनरागमनासाठी उत्सुक असेल.  

अय्यर, अश्विनवर नजर

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (४४ चेंडूंत ६४) भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली, तर अनुभवी दिनेश कार्तिकने विजयवीराची भूमिका चोख बजावताना १९ चेंडूंत नाबाद ४१ धावा फटकावल्या. मात्र, मधल्या फळीतील श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि हार्दिक पंडय़ा यांच्याकडून मोठय़ा योगदानाची भारताला आवश्यकता आहे. गोलंदाजीत पुनरागमनवीर रविचंद्रन अश्विन (२/२२), रवी बिश्नोई (२/२६) आणि रवींद्र जडेजा (१/२६) या फिरकी त्रिकुटाने पहिल्या सामन्यात अप्रतिम मारा केला. परंतु आगामी विश्वचषकासाठी संघातील स्थान पक्के करण्यासाठी अश्विनला कामगिरीत सातत्य राखावे लागेल.

हेटमायर, पूरनवर भिस्त

पहिल्या सामन्यात विंडीजच्या एकाही फलंदाजाला २५ धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. फलंदाजीत विंडीजची कर्णधार पूरन, शिम्रॉन हेटमायर आणि कायले मेयर्स यांच्यावर भिस्त आहे. गोलंदाजीत जेसन होल्डरवर जबाबदारी आहे.

  • वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : फॅनकोड अ‍ॅप, डीडी स्पोर्टस