चुरशीच्या लढतीत एक गोलच्या पिछाडीवरून उत्कृष्ट सांघिक खेळ करीत भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ३-१ असा विजय मिळविला. हा सामना डब्लीन (आर्यलड) येथे आयोजित करण्यात आला होता.
आगामी चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून भारतीय संघाची ही मालिका आयोजित करण्यात आली आहे. मेगान फ्रेझर हिने चौथ्या मिनिटालाच जोरदार चाल करीत आर्यलडचे खाते उघडले. भारताकडून पूनम राणी (३७ वे मिनिट), रितू राणी (६१ वे मिनिट) व सुनीता लाक्रा (६८ वे मिनिट) यांनी गोल करीत संघास विजय मिळवून दिला.
सामन्याच्या ३७ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत पूनमने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. ६१ व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंनी जोरदार चाल केली. रितू हिने सुरेख गोल करीत संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ सात मिनिटांनी भारतास आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत सुनीता लाक्रा हिने संघाचा तिसरा गोल केला.
या दोन संघांमधील दुसरा कसोटी सामना गुरुवारी होणार आहे.