मुंबई : पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय महिला संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत आपले आव्हान कायम राखायचे असल्यास शनिवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी करावी लागेल. इंग्लंडने पहिल्या सामन्यात ३८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी मालिकेत आघाडी घेतली. इंग्लंडचा हा भारताविरुद्धच्या २८ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील २१ वा विजय आहे. तर, भारतात खेळलेल्या १० सामन्यांतील आठवा विजय आहे.

भारताला पहिल्या सामन्यात परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही आणि त्यांनी काही चुकाही केल्या. त्याचा फटका संघाला बसला. खेळपट्टीतून गोलंदाजांना फारशी मदत नव्हती, तसेच भारताने चार फिरकीपटूंचा उपयोग केला. या चारही गोलंदाजांनी मिळून १२ षटकांत १२१ धावा केल्या. भारताने पहिल्या लढतीत श्रेयांका पाटील व सैका इशक यांना पदार्पणाची संधी दिली. मात्र, त्यांना म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही व त्यांनी खूप धावा दिल्या. अनुभवी दीप्ती शर्माला फारसे प्रभावित करता आले नाही. भारताचे क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे होते, तसेच इंग्लंडकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या डॅनिएले वेट व नॅट स्किव्हर-ब्रंटला दोन जीवदान मिळाले आणि तेच भारताला महागात पडले. भारताकडून रेणुका सिंह ठाकूरने पहिल्या षटकात दोन गडी बाद करत संघाला चांगली सुरुवात दिली. मात्र, संघाला त्याचा फायदा उचलता आला नाही. एकीकडे भारतीय फिरकीपटूंना छाप पाडता आली नाही. त्याच खेळपट्टीवर इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन (३/१५) व सारा ग्लेन (१/२५) यांनी चमक दाखवली.

भारतासमोर १९८ धावांचे आव्हान होते, मात्र सलामी फलंदाज शफाली वर्मा (५२) व कर्णधार हरमनप्रीत कौर (२६) यांनाच योगदान देता आले. स्मृती मनधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज या फलंदाजांना पूरक अशा खेळपट्टीवर चमक दाखवू शकल्या नाही. भारताला या दोन्ही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. भारतीय संघाला लवकरात लवकर आपली कामगिरी उंचवावी लागेल, कारण तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध त्यांना एक कसोटी सामना खेळायचा आहे आणि यानंतर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. भारताच्या महिला संघाला २००६ नंतर इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. भारताला मालिका विजय मिळवायचा झाल्यास त्यांना आगामी दोन्ही सामन्यांमध्ये कामगिरी उंचवावी लागेल.

* वेळ : सायं. ७ वा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.