World Cup Winning Indian Team to meet PM Narendra Modi: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला क्रिकेट संघ मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाला. विश्वचषक विजेत्या भारतीय महिला संघाचं दिल्लीत दणक्यात स्वागत करण्यात आलं. भारतीय संघ दिल्लीमध्ये ५ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे.
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत संघाने इतिहास घडवला. भारतीय संघाने पहिल्यांदा महिला विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर खेळलेला हा अंतिम सामना भारतीय महिला क्रिकेटसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला. बुधवारी हा संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे.
मुंबई विमानतळावर संघाचं वाजत गाजत कौतुक करण्यात आलं. प्रशिक्षक अमोल मजुमदार आणि सर्व खेळाडू उपस्थित होते. मोठ्या संख्येने चाहते आले होते, जे टाळ्या वाजवत इंडिया इंडियाचे नारे देत जल्लोष करत होते. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर, जनरल एव्हिएशन टर्मिनलवर फक्त मीडिया उपस्थित होती. सुरक्षेच्या कारणास्तव, लोकांना आत जाऊ दिलं गेलं नाही. त्यानंतर, सर्वजण लगेच हॉटेलकडे रवाना झाले.
हॉटेलबाहेरही टीम इंडियाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. इंडिया इंडियाचे नारे सुरू होते. याशिवाय हॉटेलबाहेर पुणेरी ढोलही होते. राधा यादव, जेमिमा रॉड्रीग्ज व स्नेह राणाने नाचत याचा आनंद साजरा केला.
भारतीय महिला संघ किती पंतप्रधान मोदींच्या भेटीला जाणार
बुधवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी संघ संध्याकाळी ६ वाजता भेटीला जाणार आहे. पंतप्रधान मोदी स्वतः हरमनप्रीत आणि संपूर्ण संघाचं अभिनंदन करतील आणि त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर, सर्व खेळाडू आपापल्या घरी रवाना होतील. फक्त शफाली वर्मा नागालँडला जाणार आहे, जिथे ती उत्तर विभागीय महिला संघाचं नेतृत्व करेल आणि आंतर-क्षेत्रीय टी-२० स्पर्धेतही सहभागी होईल.
