भारताच्या महिला संघाने यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरल्यामुळे संपूर्ण भारतातून त्यांचे कौतुक होत आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने महिला संघावर कोट्यवधींच्या बक्षिसांची उधळण केली. पण एक काळ असा होता जेव्हा महिला क्रिकेटपटूंना खूप कठीण काळातून जावे लागले होते. भारताची माजी क्रिकेटपटू मिताली राजने अनेक वर्ष महिला क्रिकेट संघाची धुरा सांभाळली. महिला संघाच्या जुन्या संघर्षाबाबत नुकतेच तिने एका मुलाखतीत भाष्य केले. सुविधा मिळत नसताना केवळ क्रिकेटच्या आवडीसाठी संघाला योगदान दिले, असे मिताली राजने सांगितले.

२००५ साली भारताचा संघ पहिल्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. या सामन्यात दुर्दैवाने भारताचा पराभव झाला. पण यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, या सामन्यासाठी प्रत्येक खेळाडूला मानधन म्हणून फक्त १००० रुपये देण्यात आले होते, या वर्षी जुलै महिन्यात द लल्लनटॉप या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिताली राजने ही आठवण सांगितली.

२००६ साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला क्रिकेट संघाला आपल्या पंखाखाली घेतले. त्याच्या आधी अतिशय मर्यादित संसाधनांवर महिला क्रिकेटची वाटचाल सुरू होती, अशी आठवण मिताली राजने सांगितली.

भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. यानंतर मिताली राजच्या मुलाखतीचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

या मुलाखतीत मिताली राजने सांगितले, २००५ साली आमचे वार्षिक करार होत नसत. तेव्हा मॅच फी आमच्यासाठी महत्त्वाची नव्हती. २००५ च्या विश्वचषकात आम्ही उपविजेते ठरलो, तेव्हा मॅच फी म्हणून आम्हाला फक्त १००० रुपये मिळाले होते. आम्ही एकूण आठ सामने खेळलो, त्यामुळे आम्हाला ८,००० रुपये मिळाले होते.

त्यावेळी भारतीय महिला क्रिकेटचे व्यवस्थापन भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन (WCAI) द्वारे केले जात होते. ही स्वतंत्र संस्था होती, जी मोठ्या प्रायोजकांशिवाय आणि आर्थिक पाठबळाविना काम करत होती. बाहेर सामने खेळायला जात असताना खेळाडू अनेकदा सामान्य रेल्वे डब्यातून आणि साध्या निवासस्थानात राहत असत. केवळ खेळाच्या प्रेमापोटी त्यांनी संघाला योगदान दिले, अशी आठवण मिताली राज यांनी सांगितली.

२००६ साली महिला क्रिकेटची धुरा बीसीसीआयच्या हाती आल्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागली. बोर्डाच्या पाठिंब्यामुळे अनेक सुविधा मिळू लागल्या. वार्षिक करार होऊ लागले, ज्यामुळे वेतनात सुधारणा झाली. खेळाडूंना प्रत्येक मालिकेसाठी आणि प्रत्येक सामन्याप्रमाणे पैसे मिळू लागले. यामुळे पुढे महिला क्रिकेटमध्ये क्रांती होत गेली, असे मिताली राजने सांगितले.

गेल्या काही वर्षात बीसीसीआयने अनेक सुधारणावादी पावले उचलली असून लिंग विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. २०२२ पासून, बीसीसीआयने पुरूष आणि महिला खेळाडूंसाठीची मॅच फी एकाच पातळीवर आणली आहे. आता एका कसोटीसाठी दोन्ही संघांना १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख आणि टी२० साठी ३ लाख रुपयांचे वेतन दिले जाते, अशी माहिती हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात दिली आहे.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली २०१७ सालीही भारताने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती.