मुंबई : हॅरिस शिल्ड शालेय स्पर्धेत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातील ६६४ धावांच्या भागीदारीने इतिहास रचला आणि दोन बड्या क्रिकेटपटूंचा उदय झाला. या दोघांनंतर फलंदाजीचा क्रमांक होता अमोल मुझुमदारचा, पण त्याला संधीच मिळाली नाही. असेच काहीसे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीबाबत घडले.

मुंबईसाठी पदार्पणात २६० धावा, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ११ हजारहून अधिक धावा, ३० शतके अशा लक्षवेधी कामगिरीनंतरही तो भारताकडून खेळण्यापासून वंचितच राहिला. याबाबतची खंतही त्याने अनेकदा बोलून दाखवली. मात्र, खेळाडू म्हणून जे राहून गेले, ते त्याने प्रशिक्षक म्हणून कमावले.

मुंबईच्या मैदानांवर घडलेल्या क्रिकेटपटूच्या अंगी खडूसपणा हा भिनलेलाच असतो. आपल्या विकेटची किंमत ओळखून खेळणे, बेजबाबदार फटका मारून बाद न होणे आणि एकदा ५० धावा केल्यास त्याचे शतकात, द्विशतकात आणि अगदी त्रिशतकात रूपांतर करणे ही शिकवण मुंबईच्या क्रिकेटपटूला लहानपणापासूनच मिळालेली असते. फलंदाज म्हणून अमोल मुझुमदार या सर्व गोष्टींसाठीच ओळखला जायचा.

ज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या मुझुमदारने अतिशय तंत्रशुद्ध शैली, खेळपट्टीवर दीर्घकाळ ठाण मांडून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना निष्प्रभ करण्याची क्षमता यामुळे प्रथमश्रेणी क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणून लौकिक मिळवला. मात्र, मधल्या फळीत सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण या महारथींच्या उपस्थितीत मुझुमदारला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची कधी संधीही मिळाली नाही. भारतासाठी न खेळलेला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणूनच तो ओळखला जात होता. परंतु आता ही ओळख बदलली असून भारतीय महिला संघाला विश्वविजेता बनवणारा पहिला प्रशिक्षक म्हणून अमोल मुझुमदार हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे.

भारतीय महिला संघ गेल्या दशकभरापासून प्रगतीपथावर होता. त्यांनी २०१७ मध्ये एकदिवसीय, तर २०२० मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम रेषा पार करण्यात त्यांना अपयश येत होते. हे चित्र बदलण्यासाठी मुझुमदारची भूमिका निर्णायक ठरली.

मुझुमदारला २०२३ मध्ये महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली आणि त्यानंतर केवळ दोन वर्षांतच त्याने महिला संघाची चार दशकांपासूनची विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा संपवली. मुंबईसह एकूण आठ वेळा रणजी जेतेपद मिळवण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी होताच. शिवाय मुंबई रणजी संघाचे कर्णधारपद आणि नंतर प्रशिक्षकपद भूषविलेल्या मुझुमदारला अपेक्षांचे दडपण काय असते आणि ते कसे हाताळले जाते याचीही कल्पना होती. हीच शिकवण त्याने भारतीय महिला खेळाडूंना दिली. त्याने स्वत: प्रकाशझोतात येण्यापेक्षा पडद्यामागे राहून मेहनत घेतली.

‘‘विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर भारताचे आव्हान धोक्यात आले होते. अशा वेळी मुझुमदार सरांनी आम्हाला खडे बोल सुनावले. त्यांनी आम्हाला जबाबदारीची जाणीव करून दिली आणि आमची गाडी पुन्हा रुळावर आली,’’ असे कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले होते. यावेळी प्रशिक्षक म्हणूनही मुझुमदारमधील ‘खडूस’पणा दिसून आला. उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघासमोर ३३९ धावांचे विशाल लक्ष्य होते. त्यावेळी इतक्या मोठ्या आव्हानाचा विचार करण्यापेक्षा आपल्याला ऑस्ट्रेलियापेक्षा केवळ एक धाव जास्त करायची आहे असा सकारात्मक संदेश मुझुमदारने दिला. परिणामी भारतीय संघाने तो सामना जिंकला.

मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने गेल्या वर्षभरात तंदुरुस्ती आणि क्षेत्ररक्षण यावर विशेष मेहनत घेतली. याचे फळ त्यांना अंतिम लढतीत मिळाले. प्रचंड उष्ण आणि दमट वातावरणातही भारतीय खेळाडूंची ऊर्जा कधीही कमी झाली नाही. त्यांच्याकडून काही झेल सुटले, पण तितकेच शानदार झेलही त्यांनी पकडले. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटला नवी पहाट बघण्याची संधी मिळाली. भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक यशातील ‘गुरू’ मुझुमदारचा वाटा कधीही कोणी विसरू शकणार नाही, हे नक्की!

आमच्या सर्व खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांच्या चमूचा मला अभिमान आहे. हा क्षण अनुभवण्यासाठी हजारो लोक स्टेडियममध्ये उपस्थित होते आणि करोडो लोकांनी टीव्हीवर सामना पाहिला असेल. यातून अनेक मुलींना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे. – अमोल मुझुमदार