India Won Asia Cup 2025 Final against Pakistan: भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषक आपल्या नावे केला आहे. तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला. विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे.
भारताला अखेरच्या षटकात ६ चेंडूत १० धावांची गरज होती. १९व्या षटकात फहीम अश्रफने अखेरच्या चेंडूवर शिवम दुबेला झेलबाद केलं. यानंतर अखेरच्या षटकासाठी रिंकू सिंग फलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवर तिलक-रिंकूने २ धावा केल्या. तिलकने दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला आणि इथेच भारताचा विजय पक्का झाला. त्यानंतर संपूर्ण स्पर्धा न खेळलेल्या रिंकू सिंहने फक्त १ चेंडू खेळत विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताने आशिया चषकात पाकिस्तानचा ३ वेळा पराभव करत हॅटट्रिक नोंदवली आहे.
एकही सामना न गमावत टीम इंडिया ठरली आशिया चषक चॅम्पियन
पाकिस्तानने दिलेल्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात प्रचंड वाईट झाली. भारताने पॉवरप्लेमध्ये ३ मोठ्या विकेट्स गमावल्या. अभिषेक ५ धावा करत, गिल १२ धावा तर सूर्यकुमार यादव १ धावा करत बाद झाले. यानंतर तिलक वर्माने संजू सॅमसनच्या साथीने भारताचा डाव सावरला. तिलक वर्माने अर्धशतक करत मैदानावर पाय घट्ट रोवून उभा राहिला. संजू २४ धावा करत बाद झाला. तिलकने यानंतर शिवम दुबेसह अर्धशतकी भागीदारी केली. तर शिवम दुबेने तिलक वर्माला चांगली साथ दिली आहे. तिलक-शिवमने ६० धावांची भागीदारी रचली, जी महत्त्वपूर्ण ठरली. शिवम दुबे कमालीचे मोठमोठे फठके खेळले. तिलक वर्मा भारतासाठी या सामन्यात तारणहार ठरला.
पाकिस्तानकडून फहीम अश्रफने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले. तर अबरार अहमद आणि शाहीन आफ्रिदीने १-१ विकेट घेतली.
भारताने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली आणि संघाच्या सलामीवीरांनी ८४ धावांची भागीदारी रचत एकही विकेट गमावली नाही. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने ५६ धावा केल्या. यासह फरहानने पुन्हा भारताविरूद्ध अर्धशतक झळकावलं. तर फखर जमाननेही ४६ धावांची खेळी केली. पण वरूण चक्रवर्तीने भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि टीम इंडियाचं सामन्यात पुनरागमन झालं.
पाकिस्तानचे सलामीवीर वगळता इतर सर्व फलंदाज फेल ठरले. पाकिस्तानच्या ३ फलंदाजांनी तर खातंही उघडलं नाही. कुलदीप यादवने पुन्हा एकदा भारतासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतले. कुलदीपविरूद्ध फलंदाजांनी सुरूवातीच्या षटकांमध्ये फटकेबाजी केली. पण नंतर त्याने एका षटकात ३ विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरूंग लावला. याशिवाय बुमराह, अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. यासह पाकिस्तानचा संघ १४६ धावांवर सर्वबाद झाला.