युवा भारतीय संघाने बुधवारी इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आशिया चषक पुरुष हॉकी 2022 स्पर्धेमध्ये जपानला १-० ने हरवून कास्यपदकावर नाव कोरले. सहाव्या मिनिटाला मनिंदर सिंग आणि उत्तम सिंग यांच्या शानदार सहकार्याच्या मदतीने राजकुमार पालने भारतासाठी गोल केला. शेवटच्या मिनिटात १० खेळाडूंसह खेळूनही भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानला बरोबरी करण्याची संधी दिली नाही. या सामन्यात जपानला सात तर भारताला फक्त दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने दुसऱ्यांदा कास्यपदक जिंकले आहे.

भारताने पहिल्या पाच मिनिटांत अनेकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण डीच्या आतमध्ये जाण्यात त्यांना यश आले नाही. मात्र, सहाव्या मिनिटाला उत्तम सिंगने उजव्या बाजूने चेंडू राजकुमारकडे वळवला. त्याने जपानचा गोलरक्षक ताकाशी योशिकावाला हुलकावणी देऊन भारतासाठी गोल केला. तीन मिनिटांनंतर भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र गोल होऊ शकला नाही.

पहिल्या सत्रातील शेवटच्या पाच मिनिटांत जपानने भारताची बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, भारताच्या बचाव फळीने त्यांना तशी संधी दिली नाही. २०व्या मिनिटाला जपानला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. भारतीय बचावफळीने तेही परतावून लावले. मध्यांतरानंतर जपानने आक्रमक खेळ करत पुन्हा सलग दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यानंतर भारताला आणखी एक गोल करण्याची संधी मिळाली पण एसव्ही सुनीलच्या पासवर राजकुमारचा फटका चुकीच्या बाजूला गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा कर्णधार बिरेंद्र लाक्राला त्याच्या भक्कम बचावात्मक कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यात आज संध्याकाळी कोरिया आणि मलेशिया आमनेसामने येणार आहेत.