सुरेख सांघिक समन्वय दाखवित भारताने तुल्यबळ चीनला ४-० असे सहज पराभूत केले आणि जागतिक हॉकी लीगमध्ये पुरुष गटात लागोपाठ चौथा विजय नोंदविला. या विजयासह भारताने साखळी गटात आघाडी कायम राखली आहे. भारतीय खेळाडूंनी सांघिक कौशल्याचा चांगला प्रत्यय दाखवित त्यांना सामन्यावर प्रभुत्व मिळविण्यापासून वंचित ठेवले. १२व्या मिनिटाला व्ही. आर. रघुनाथ याने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत भारताचे खाते उघडले. २७व्या मिनिटाला रघुनाथने मारलेला फटका चीनच्या
बचावरक्षकाच्या स्टीकला लागून गोलजाळ्यात गेला. त्यामुळे भारताला २-० अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धात सामन्याच्या ४०व्या मिनिटाला भारताच्या धरमवीर सिंगने उत्कृष्ट मैदानी गोल केला. त्यानंतर दोनच मिनिटांनी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत रुपिंदरपाल सिंग याने भारताचा चौथा गोल केला. या सामन्यात
भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यापैकी दोन कॉर्नरद्वारा भारताने गोल केले. भारताने आतापर्यंत झालेले चारही सामने जिंकून बारा गुणांसह साखळी गटातील अव्वल स्थान राखले आहे.