जागतिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ज्युलियन शेंकवर मिळविलेल्या सनसनाटी विजयासह अवध वॉरियर्सने आयबीएलमध्ये पुणे पिस्टन्स संघाविरुद्ध ३-० अशी विजयी आघाडी घेतली. मात्र नंतरचे दोन्ही सामने जिंकून पुण्याने लाज राखली. ही लढत अवध वॉरियर्सने ३-२ अशी खिशात घातली.
थायलंड स्पर्धाजिंकणाऱ्या किदम्बी श्रीकांतने अवध वॉरियर्सला झकास सलामी करून दिली. त्याने सौरभ वर्मावर २१-१८, २१-१६ अशी मात करताना स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. पाठोपाठ सिंधूने शेंकवर २१-२०, २१-२० असा रोमहर्षक विजय मिळवला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू ७-१४ अशी पिछाडीवर होती. तेथून तिने शेंकच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला. तिने हा गेम २१-२० असा जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. तिच्या विजयामुळे अवध संघाने २-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली होती.
पुरुषांच्या दुहेरीत अवधच्या मथायस बोए व मार्किस किडो यांनी सनावे थॉमस व अरुण विष्णू यांचा २१-१५, २१-१६ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला आणि संघाची आघाडी ३-० अशी वाढवली. टिएन मिन्ह युगेनने अवधच्या गुरुसाईदत्तवर २१-१२, २१-१८ अशी मात करत पुण्याला पहिला विजय मिळवून दिला. त्यानंतरच्या अखेरच्या सामन्यात पुण्याच्या अश्विनी पोनप्पा-जोकिम फिशर नील्सन या मिश्र दुहेरी जोडीने मार्किस किडो आणि पिया बर्नाडेथ यांचा २१-१६, २१-१४ असा सहज पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2013 रोजी प्रकाशित
सिंधूचा शेंकवर सनसनाटी विजय
जागतिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ज्युलियन शेंकवर मिळविलेल्या सनसनाटी विजयासह अवध वॉरियर्सने आयबीएलमध्ये पुणे पिस्टन्स संघाविरुद्ध ३-० अशी विजयी आघाडी घेतली.
First published on: 27-08-2013 at 02:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian badminton league pv sindhu beats tine baun in battle of the ages