scorecardresearch

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सिंधू, लक्ष्यची सुवर्णकमाई ; भारताचे बॅडिमटनमध्ये निर्विवाद वर्चस्व, सात्त्विक-चिरागचेही सोनेरी यश

सिंधूने आपल्या पदकांच्या यादीत राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकाचा समावेश करताना कॅनडाच्या मिशेल लीवर २१-१५, २१-१३ अशी सहज मात केली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सिंधू, लक्ष्यची सुवर्णकमाई ; भारताचे बॅडिमटनमध्ये निर्विवाद वर्चस्व, सात्त्विक-चिरागचेही सोनेरी यश

बर्मिगहॅम : भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी राष्ट्रकुलच्या बॅडिमटन प्रकारात अपेक्षित कामगिरी करताना सोमवारी सुवर्णपदकांची कमाई केली. एकेरीतील या यशापाठोपाठ चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीने पुरुष दुहेरीतही सोनेरी यश मिळवले. एकाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच निर्भेळ यश मिळविले. भारताने वैयक्तिक प्रकारात तीन सुवर्ण, दोन कांस्य, तर सांघिक गटात रौप्य अशी एकूण सहा पदके पटकावली.

सिंधूने आपल्या पदकांच्या यादीत राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकाचा समावेश करताना कॅनडाच्या मिशेल लीवर २१-१५, २१-१३ अशी सहज मात केली. आठ वर्षांपूर्वी ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत मिशेलने सिंधूचा पराभव केला होता. मात्र, आठ वर्षांनी सिंधूने सुवर्णपदकाच्या लढतीत खेळताना मिशेलला कोणतीही संधी दिली नाही. जोरकस स्मॅश आणि अचूक ड्रॉप शॉट्स हे सिंधूच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.

सिंधूपाठोपाठ लक्ष्यने एन्ग त्झे योंगचा कडवा प्रतिकार एका गेमच्या पिछाडीनंतर १९-२१, २१-९, २१-१६ असा परतवून लावला. पहिल्या गेममधील पराभव वगळता लक्ष्यने नंतर दोन्ही गेममध्ये योंगला निष्प्रभ केले. दुसऱ्या गेममध्ये त्याने वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना सलग बारा गुणांची कमाई केली. तिसऱ्या गेममध्ये पहिलाच ‘मॅच पॉइंट’ जिंकत लक्ष्यने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत चिराग-सात्त्विक जोडीने यजमान इंग्लंडच्या हेन लेन आणि सीन मेंडी जोडीचा २१-१५, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

श्रीकांत, गायत्री-ट्रिसाला कांस्य

किदम्बी श्रीकांतने राष्ट्रकुल स्पर्धेतील पुरुष एकेरीत कांस्यपदक पटकावले. श्रीकांतने सिंगापूरच्या जिआ हेग तेहला २१-१५, २१-१८ असे नमवले. महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद-ट्रिसा जॉली जोडीने ऑस्ट्रेलियाच्या वेंडी हुसान यु शेन आणि ग्रोनया समरविलचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला.

मी चांगली कामगिरी करू शकेन याचा विश्वास होता. सिंधूच्या पदक वितरण सोहळय़ात भारताचे राष्ट्रगीत ऐकून प्रेरणा मिळाली. माझ्या विजयानंतरही भारताचे राष्ट्रगीत वाजणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. – लक्ष्य सेन

मी या सुवर्णपदकाची अनेक वर्षांपासून वाट पाहात होते. अखेरीस ते मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. मला प्रेक्षकांचा उत्तम पाठिंबा मिळाला. त्यांनीच जणू मला विजयी केले. 

पी. व्ही. सिंधू

टेबल टेनिस : शरथची सुवर्णझळाळी ; एकेरीसह दुहेरीतही सोनेरी यश; साथियानला कांस्य

भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने राष्ट्रकुलच्या पुरुष एकेरीसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकण्याची चमकदार कामगिरी केली. तसेच ज्ञानसेकरन साथियानने भारताच्या खात्यात आणखी एका कांस्यपदकाची भर घातली. ४० वर्षीय शरथ कमलने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या लिआम पिचफोर्डवर ११-१३, ११-७, ११-२, ११-६, ११-८ असा विजय साकारत तब्बल १६ वर्षांनी सुवर्णपदकाची कमाई केली. सामन्यातील पहिला गेम गमावल्यानंतर शरथने पिचफोर्डला पुनरागमनाची संधी दिली नाही. यापूर्वी, शरथने २००६च्या मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नवी दिल्ली येथे २०१०मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळवले होते.

मिश्र दुहेरीत शरथने श्रीजा अकुलाच्या साथीने सुवर्ण कामगिरी केली. शरथ-श्रीजा जोडीने मलेशियाच्या जावेन चूंग आणि कारेन लाइन जोडीवर ११-४, ९-११, ११-५, ११-६ अशी मात केली.

पुरुष एकेरीतील कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या साथियानने इंग्लंडच्या पॉल िड्रकहॉलवर चुरशीच्या लढतीत ४-३ अशा फरकाने विजय मिळवला. साथियानने ड्रिंकहॉलला ११-९, ११-३, ११-५, ८-११, ९-११, १०-१२, ११-९ असे नमवले.

१३ शरथ कमलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २००६मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने एकूण १३ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये सात सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.

बॉक्सिंग : सागरचे रुपेरी यश

बॉक्सिंगपटू सागर अहलावतने (९२ किलोवरील) राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. सागरने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डिलिशियस ओरिएकडून ०-५ अशी हार पत्करली.

२० वर्षीय सागरने यापूर्वी झालेल्या लढतींमध्ये आक्रमक खेळ करत सर्वाचे लक्ष ठेवले होते. मात्र, अंतिम सामन्याच्या पहिल्या फेरीत त्याने बचावात्मक खेळावर अधिक भर दिला. दुसऱ्या फेरीत हरयाणाचा सागर काहीसा थकलेला दिसला. त्याला पंचांनी ताकीदही दिली. तिसऱ्या फेरीत प्रतिस्पर्धी ओरिएच्या आक्रमक खेळामुळे सागरला दुखापतही झाली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian badminton players strong performance in commonwealth game 2022 zws

ताज्या बातम्या