scorecardresearch

आक्रमक फलंदाजीच नाही, गोलंदाजीतही भेदक मारा, कोण आहेत भारताचे भविष्यातील अष्टपैलू खेळाडू? वाचा सविस्तर

कोण आहेत भारताचे भविष्यातील अष्टपैलू खेळाडू? जाणून घ्या सविस्तर माहिती

आक्रमक फलंदाजीच नाही, गोलंदाजीतही भेदक मारा, कोण आहेत भारताचे भविष्यातील अष्टपैलू खेळाडू? वाचा सविस्तर
फलंदाजीसह गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारताच्या खेळाडूंविषयी जाणून घ्या सविस्तर (image-bcci)

विविध स्तरांवर क्रिकेटची मैदानं गाजवणाऱ्या खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड केली जाते. फलंदाजीत आक्रमकपणा, भेदक गोलंदाजीचा मारा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना निवड समितीकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूला क्रिकेटच्या मैदानात अनन्य साधारण महत्व असतं. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत गोलंदाजी करताना क्वचितच कधी पाहिलं असेल. पण भारतात असेही अष्टपैलू खेळाडू आहेत, जे त्यांच्या बॅटने तर कमाल करतातच, पण गोलंदाजीतही त्यांचा खारीचा वाटा आहे.

मागील काही दशकांमध्ये विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सुरेश रैना यांसारख्या खेळाडूंनी गोलंदाजीतही धमक दाखवली आहे. पण मागील काही वर्षांपासून भारताच्या काही फलंदाजांना गोलंदाजी करण्यात रस नसल्याचं क्रिकेटच्या मैदानात दिसून येत आहे. विशेषत: एकदिवसीय क्रिकेटच्या सामन्यात अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. रोहित शर्माने दुखापत झाल्यानंतर फिरकी गोलंदाजी करणं बंद केलं. भारतीय संघाला या सर्व गोष्टींचा कमतरता आयसीसीच्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये भासते.

नक्की वाचा – ‘योग्य संधी मिळण्यासाठी संजू सॅमसनने धीर धरावा’, प्रशिक्षक म्हणाले, ” सूर्यकुमार यादवलाही….”

संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत समतोल राहावा यासाठी अष्टपैलू खेळाडूंची आवश्यकता असते. पण संघातील परिस्थितीनुसार एखाद्या वेळी फलंदाजांची संख्या वाढवावी लागते, तर कधी सहा गोलंदाजांना खेळवावं लागतं. त्यामुळे अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघासाठी कोणते विकल्प असू शकतात? याबाबत जाणून घेऊयात डोमॅस्टिक व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजीसह गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंविषयी…


१) अभिषेक शर्मा

मधल्या फळीत आणि सलामीत धडाकेबाज कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज म्हणून अभिषेक शर्माचा दबदबा आहे. पंजाब संघासाठी खेळणारा अभिषेक जबरदस्त लेफ्ट आर्म स्पिनरही आहे. २२ वर्षीय अभिषेकने विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत ४२ च्या सरासरीनं २१८ धावा केल्या आहेत. तसंच सात सामन्यांमध्ये त्याने १२ विकेट्स घेतल्या असून ५/४१ अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. अ विभागात खेळत असताना अभिषेकने ३८ सामन्यांमध्ये ३३.४७ च्या सरासरीनं ११३८ धावा कुटल्या असून २१ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच ६८ टी२० क्रिकेटमध्ये १३५.०४ चा स्ट्राईक रेट आणि २७.८४ च्या सरासरीनं त्याने धावा केल्या आहेत. तर भेदक गोलंदाजी करून ६.३८ च्या इकॉनॉमीने २६ विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं केली आहे.

२) रियान पराग

आसामचा मधल्या फळीतील चमकदार खेळाडू रियान परागने विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केलीय. १२२ चा स्ट्राईक रेट असलेल्या परागने ७७ च्या सरसरीनं ५३७ धावा केल्या आहेत. तसंच त्याने तीन शतकही ठोकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ए लिस्ट मध्ये खेळताना त्याने जवळपास ४० च्या सरासरीनं १३३८ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे तो ऑफ स्पिनरही आहे. ३४ सामन्यांमध्ये त्याने २१ विकेट्स घेतल्या आहेत.

३) ललित यादव

दिल्लीचा खेळाडू ललित यादवने विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केलीय. विशेषत: गोलंदाजीत त्याने अप्रतिम कामगिरी केलीय. ३.५३ इकॉनॉमीत सात सामन्यांमध्ये त्याने नऊ विकेट्स घेतल्या आहेत. यादव मधल्या फळीतील एक आक्रमक फलंदाजही आहे. लिस्ट ए च्या सामन्यांमध्ये ४१ च्या सरासरीनं त्यानं ८३५ धावा केल्या आहेत. तसेच भेदक गोलंदाजी करुन त्याने ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी20 मध्येही त्यानं ६७ सामन्यांमध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत.

नक्की वाचा – “Greatest Off All Time म्हणजेच GOAT”, बकऱ्यावर चढला फुटबॉल फिव्हर, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, ‘भावा याला तर FIFA ला पाठवा’


४) अब्दुल सामद

जम्मू काश्मीरचा अब्दुल सामद फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगली कामगिरी करतो. आक्रमक फलंदाज म्हणून डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये त्यानं ठसा उमटवला आहे. लिस्ट ए च्या २० सामन्यांमध्ये त्याने ४९४ धावा केल्या आहेत. तसेच २१ वर्षीय सामदने २० सामन्यांत सहा विकेट्सही घेतल्या आहेत. सनरायझर्स हैद्राबादने सामदला गतवर्षी रिटेन प्लेयर म्हणून घेतलं होतं.

५) राहुल तेवतीया

एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अशी राहुल तेवतीयाची ख्याती आहे. विजय हजारे स्पर्धेत सात सामन्यांमध्ये त्याने ११ विकेट्स घेतल्या आहेत. या आक्रमक डावखुऱ्या फलंदाजाने लेग स्पिन गोलंदाजीतही जलवा दाखवला आहे. आयपीएलमध्ये तेवतीयाने चमकदार कामगिरी केलीय. टी२० क्रिकेट मध्ये ४.७९ च्या इकॉनॉमीत ४४ विकेट्स घेतल्या आहेत. तेवतीया एक आक्रमक फलंदाज असून सामना विजयाच्या दिशेनं फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

“Greatest Off All Time म्हणजेच GOAT”, बकऱ्यावर चढला फुटबॉल फिव्हर, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, ‘भावा याला तर FIFA ला पाठवा’

६) तिलक वर्मा

२० वर्षीय तिलक वर्माने विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत ८० च्या सरासरीनं ४०२ धावा केल्या आहेत. त्याच्या या चमकदार कामगिरीमुळं भारताच्या अ संघाकडून वर्माची बांगलादेश दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही त्यानं चांगली कामगिरी केलीय. मुंबई इंडियन्स संघाकडून वर्माने गोलंदाजीही केली आहे. लिस्ट ए च्या सामन्यांमध्ये वर्माची ५.१८ एव्हढी सरासरी असून त्याने २५ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या आहेत.

७) नितिश राणा

डोमॅस्टिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये नितिश राणाने अप्रतिम कामगिरी केलीय. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी त्यानं धावांचा पाऊस पाडला आहे. यंदाच्या विजय हजारे क्रिकेट स्पर्धेतही राणाने ३.९५ इकॉनॉमीनं सहा सामन्यांमध्ये ८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटच्या सामन्यांमध्ये राणाने ४१ सामन्यांमध्ये २३ विकेटस् घेतल्या आहेत. तर ३९.११ च्या सरासरीनं राणाने २००० धावा कुटल्या आहेत.

८) राजवर्धन हंगरगेकर

२०२२ मध्ये झालेल्या U-19 वर्ल्डकपमध्ये राजवर्धन हंगरगेकरने अष्टपैलू कामगिरी करुन भारतीय क्रिकेट संघाला विजय संपादन करुन दिलं आहे. विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत सहा सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेण्याची कमालही त्याने केली आहे. महाराष्ट्राचा युवा खेळाडू राजवर्धनने लिस्ट ए च्या दहा सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:16 IST

संबंधित बातम्या