भारत-द. आफ्रिका कसोटी मालिका
भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांचे मत:- भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्याने आपला सर्वोत्तमतेचा लौकिक टिकवला आहे. खेळपट्टी हा घटक त्यांनी आपले अप्रतिम कौशल्य आणि सातत्य या बळावर निर्थक ठरवला आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केले.
विशाखापट्टणमच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर चेंडू धिम्या गतीने खाली राहात होता. परंतु मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात भेदक गोलंदाजी केली. रविचंद्रन अश्विननेही पहिल्या डावात सात बळी घेण्याची किमया साधली, असे अरुण यांनी सांगितले.
‘‘खेळपट्टी अनुकूल असावी, अशी अपेक्षा आम्ही केली नव्हती. परंतु जागतिक क्रिकेटमधील बलाढय़ संघ हा लौकिक असल्याने खेळपट्टी कोणतीही असली तरी गृहमैदानाप्रमाणेच ती स्वीकारायला हवी. परिस्थितीपुढे शरणागती पत्करण्यापेक्षा कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे असते,’’ असे अरुण यांनी सांगितले. जेव्हा आम्ही परदेशात जातो, तेव्हा क्वचितच आम्ही खेळपट्टीकडे पाहतो. कारण खेळपट्टीपेक्षा गोलंदाजीतील कामगिरी महत्त्वाची असते, असे अरुण यावेळी म्हणाले.
भारताचे वेगवान गोलंदाज पाटी खेळपट्टय़ांवरही उत्तम कामगिरी करत असल्यामुळे अरुण यांनी समाधान प्रकट केले. यासंदर्भात ते म्हणाले, ‘‘आम्हाला परदेशात जेव्हा वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टय़ा मिळतात. तेव्हा भारतीय गोलंदाजांनी या खेळपट्टय़ांवर कशी गोलंदाजी करावी, हे शिकायला हवे, असे ताशेरे ओढले जातात. मात्र फिरकीला साथ देणारी आशियाई देशांमधील खेळपट्टी असेल, तर हेच टीकाकार पहिल्या दिवसापासून चेंडू कसा काय वळू शकतो, असा सवाल विचारतात. म्हणजेच चेंडू स्विंग होणे स्वीकारार्ह असते, परंतु चेंडू वळणे स्वीकारले जात नाही.’’
जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम स्थान मिळवण्यासाठी वातावरण आणि खेळपट्टय़ा हे मुद्दे गौण असावे लागतात, असे अरुण म्हणाले. आव्हानात्मक परिस्थितीवर कौशल्य आणि तांत्रिक ज्ञानाच्या बळावर मात करता येईल, याकरिता शमीचे उदाहरणे महत्त्वाचे ठरेल, असे अरुण यांनी सांगितले.
गहुंजेच्या खेळपट्टीविषयी उत्सुकता
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने गहुंजेची खेळपट्टी पुन्हा चर्चेत आली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये या मैदानावर झालेल्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने तीन दिवसांत भारताला हरवले होते. या सामन्यात ४० फलंदाज बाद झाले. यापैकी ३१ फलंदाजांना फिरकी गोलंदाजांनी बाद केले. त्यामुळे या खेळपट्टीवर तीव्र टीका झाली होती. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) खराब खेळपट्टीचा शिक्का मारला होता. त्यानंतर या मैदानावर दोन एकदिवसीय सामने झाले. यापैकी एका सामन्यात भारताने न्यूझीलंडला हरवले, तर गतवर्षी दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला हरवले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल, याबाबत क्रिकेट-रसिकांमध्ये उत्सुकता आहे.
दुसऱ्या कसोटीत उत्तम कामगिरीचा मुथूस्वामीचा निर्धार
पुणे : कारकीर्दीतील पहिल्या कसोटीत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान द्यावे, हे माझे स्वप्न अपयशी ठरले, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू सेनूरॅन मुथूस्वामीने व्यक्त केली. विशाखापट्टणमच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात मुथूस्वामीने दोन डावांत अनुक्रमे ३३ आणि नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. याशिवाय भारताचा कर्णधार विराट कोहलीचा बळी मिळवला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान मिळाल्यास आणखी उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील, असे मत मुथूस्वामीने व्यक्त केले.