Suresh Raina On Rohit- Virat: भारतीय संघाने आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेच्या दृष्टीने वाटचाल करायला सुरुवात केली आहे. ही स्पर्धा सुरू व्हायला आणखी काही महिने शिल्लक आहेत. तत्पूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा ही स्पर्धा खेळणार का? की या स्पर्धेआधीच दोघेही निवृत्ती जाहीर करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताचा इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. अँडरसन – तेंडुलकर मालिका ही २-२ ने बरोबरीत समाप्त झाली.

वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेवेळी रोहित शर्मा हा ४० वर्षांचा असेल तर विराट कोहली ३९ वर्षांचा असेल. त्यामुळे भारतीय टीम मॅनेजमेंट आणि गौतम गंभीर विराट -रोहितला पाठिंबा देणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कसोटी आणि टी -२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा रोहित सध्या वनडे संघाचा कर्णधार आहे. पण माध्यमातील वृत्तानुसार, ही जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवली जाऊ शकते. त्यामुळे रोहितला कर्णधारपद सोडावं लागेल.

सुरेश रैना काय म्हणाला?

भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाला अजूनही वाटतं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही संघात असणं खूप महत्वाचं आहे. भारतीय संघाला दोघांची खूप जास्त गरज आहे. सुरेश रैनाने टेलिकॉम एशिया स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “ भारतीय संघात सध्या पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अनुभवी फलंदाज नाही. मुख्यतः धावांचा पाठलाग करताना. रोहित आणि विराटचा अनुभव हा भारतीय संघासाठी खूप महत्वाचा आहे. युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंची साथ मिळणं गरजेचं आहे. शुबमन गिलने दमदार कामगिरी केली आहे. पण त्याला विराट आणि रोहितसारख्या अनुभवी खेळाडूंची गरज आहे.”

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली होती. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसून आलेला नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफीत विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामान खेळताना दिसून आले होते. याबाबत बोलताना सुरेश रैना म्हणाला, “ त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकप स्पर्धा जिंकली. विराटने गेल्या आयपीएल स्पर्धेत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. दोघांची नेतृत्व क्षमता पाहता, दोघेही संघात असणं खूप गरजेचं आहे.”