Cricketers Reaction On Ahmedabad Plane Crash Incident: गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारं प्रवासी विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं आहे. या विमानात अनेक प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. विमान कोसळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान या दुर्घटनेवर माजी क्रिकेटपटूंनी एक्स अकाऊंवरून पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जायला निघाले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानात २४२ प्रवासी होते. ज्यात १६९ भारतीय आणि ५३ ब्रिटिश प्रवाशांचा समावेश आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर शिखर धवनची प्रतिक्रिया
या दुर्घटनेनंतर माजी भारतीय क्रिकेटपटूंनी एक्स अकाऊंवरून पोस्ट शेअर करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिखर धवनने पोस्ट शेअर करत लिहिले, ” मेघानीजवळ घडलेल्या विमान अपघाताने व्यथित झालेल्या प्रत्येकासाठी मनापासून प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबियांना धैर्य आणि ताकद मिळो हीच प्रार्थना.”
भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर केली आहे. त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले, ” ही घटना खूपच दु:खद आणि अस्वस्थ करणारी आहे. अहमदाबादमधून आलेली ही बातमी फार वेदनादायक आहे. “
भारताचा माजी खेळाडू युसुफी पठाणने देखील एक्स अकाऊंवरून पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ” अहमदाबाद – लंडन विमानाचा अहमदाबाद विमानतळाजवळ अपघात झाला. ही बातमी मिळताच मला धक्का बसला. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप असतील अशी प्रार्थना करतो.”
हरभजन सिंगची भावुक प्रतिक्रिया
हरभजन सिंगने आपल्या एक्स अकाऊंवरून पोस्ट शेअर करत लिहिले, ” अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची बातमी मिळताच मी आश्चर्यचकित झालो. या दुःखद घटनेतील पीडित आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी माझ्या मन:पूर्वक प्रार्थना आणि संवेदना आहेत. त्यांनी ज्या असह्य वेदना आणि अपार क्षतीचा सामना केला आहे, त्यासाठी शब्द अपुरे वाटतात. या कठीण काळात त्यांना बळ, धैर्य आणि आधार मिळो हीच प्रार्थना करतो.”