नवी दिल्ली : भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला पुढील महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या ‘फिडे’ विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. ही स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे रंगणार आहे.

यापूर्वी सहभाग निश्चित केलेल्या एका स्पर्धकाने माघार घेतल्यामुळे दिव्याला थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूरकर दिव्याने अलीकडेच ग्रँड स्विस स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याआधी तिने महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले होते आणि या कामगिरीच्या आधारेच तिने सर्वांत प्रतिष्ठेचा ग्रँडमास्टर किताबही मिळवला होता.

आता ती विश्वचषक स्पर्धेत अन्य २० भारतीयांसह सहभागी होईल. भारतीय खेळाडूंचे नेतृत्व जगज्जेता दोम्माराजू गुकेश करेल. महिलांतील विद्यमान जगज्जेती जू वेन्जून आणि हो यिफान या चिनी खेळाडूंनी यापूर्वीच या स्पर्धेचे आमंत्रण नाकारले आहे. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूने ऐन वेळी माघार घेतल्यामुळे दिव्याचा समावेश करण्यात आल्याने ‘फिडे’ने म्हटले आहे. या स्पर्धेत जगातील २०६ सर्वोत्तम खेळाडू बाद फेरी पद्धतीत खेळतील. स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू २०२६ च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरतील.