तीनदा जेतेपद मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा प्रयत्न आजपासून सुरू होणाऱ्या पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धेत जेतेपद मिळवत पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवण्याचे असणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना चीनशी खेळणार आहे.

भारत व चीन असलेल्या ‘अ’ गटात जपान आणि कझाकस्तान संघांचाही समावेश आहे. तर, ‘ब’ गटात पाच जेतेपद मिळवणारा दक्षिण कोरिया, मलेशिया, बांगलादेश आणि चायनिज तैपेइ यांचा सहभाग असेल. कझाकस्तान तीन दशकांनंतर पहिल्यांदाचा आशिया चषकात सहभाग नोंदवेल. तर पाकिस्तान संघ खेळणार नसल्याने बांगलादेशला स्थान मिळाले आहे. प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. हे सामने सात सप्टेंबरला होतील. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वर्षी १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यासाठी भारताकडे सर्वश्रेष्ठ आणि अखेरची संधी असेल.

भारताला या स्पर्धेत शीर्ष मानांकन मिळाले आहे.या स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला बचावात कामगिरी उंचवावी लागेल. भारताची चिंता ही पेनल्टी कॉर्नर आहे. यामध्ये संघाची मदार ही हरमनप्रीतवर असते. पी.आर.श्रीजेशच्या निवृत्तीनंतर गोलरक्षणातही भारताला अडचणी भासत आहेत. क्रिशन बहादूर पाठक आणि सूरज करकेरा दबावात दिसत आहेत. भारतीय संघ पहिल्या सामन्यात चीनचा सामना करणार आहे. चीन हा जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानावर आहे. २००९ मध्ये मलेशिया येथे झालेल्या आशिया चषकात ते तिसऱ्या स्थानी राहिले होते. त्यामुळे या लढतीत भारताचे पारडे जड आहे.

वेळ : दुपारी ३ वा.थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन १.