हैदराबादला ५ एप्रिलला प्रारंभ आणि २१ मे रोजी अंतिम लढत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील दुष्काळामुळे गेल्या वर्षी आयोजनाची संधी गमावलेल्या मुंबई आणि पुण्यात यंदा इंडियन प्रीमिअर लीगची जत्रा भरणार आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात प्रत्येकी सात लढती होणार आहेत.

सातव्या हंगामाचा तपशीलवार कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला. यानुसार ५ एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हैदराबाद येथील लढतीने हंगामाची सलामी होणार आहे. हैदराबादमध्येच २१ मे रोजी अंतिम मुकाबला रंगेल.

राज्यातली जनता दुष्काळाने होरपळत असताना आयपीएल स्पर्धाच्या सामन्यांसाठी पाण्याचा अपव्यय नको, असा न्यायालयाने आदेश दिल्याने गेल्या वर्षी राज्यातील काही लढती अन्यत्र स्थानांतरित करण्यात आल्या.

यंदा एकूण ४७ दिवसांच्या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून, प्रत्येक संघाची अन्य संघांशी एक लढत घरच्या मैदानावर तर दुसरी प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होईल. मुंबई, पुण्यासह बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, इंदूर, कानपूर, कोलकाता, मोहाली, राजकोट येथे स्पर्धेच्या लढती होतील. २०११ नंतर इंदूरला आयपीएल सामन्यांच्या आयोजनाची संधी मिळणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या तीन लढतींसाठी इंदूर घरचे मैदान असणार आहे. क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी ठिकाणाची घोषणा नंतर करण्यात येणार आहे.

येत्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव २० फेब्रुवारीला होणार आहे. सात खेळाडूंना दोन कोटी रुपयांची पायाभूत किंमत मिळाली आहे. ३५१ खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील. यात संलग्न देशांचे सहा खेळाडू आहेत. इंग्लंडचा बेन स्टोक्स, ईऑन मॉर्गन, इशांत शर्मा यांच्यावर संघांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian premier league
First published on: 16-02-2017 at 02:18 IST