लोकप्रियता आणि अन्य मापदंडाच्या बाबतीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) ही वेगळ्या धाटणीची स्पर्धा ठरणार आहे. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंबरोबर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे. आयएलएल ही स्पर्धा भारतीय फुटबॉलपटूंसाठी योग्य व्यासपीठ असून येत्या तीन-चार वर्षांत भारतातून अनेक चांगले खेळाडू तयार होतील, असे मत केरळ ब्लास्टर्स संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर मॉर्गन यांनी व्यक्त केले.
‘‘आयएसएलच्या सामन्यांना सर्वच स्टेडियममध्ये तुफान गर्दी होत आहे. हा पहिलाच मोसम असल्यामुळे ही लीग यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. भारतात फुटबॉल हा खेळ किती लोकप्रिय आहे, हे लढतींना मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसून येत आहे. पुढील वर्षी आणखी महान खेळाडू या स्पर्धेत खेळू लागले तर या स्पर्धेला नक्कीच चांगले यश मिळेल, असे मला वाटते,’’ असेही आय-लीगमधील ईस्ट बंगाल क्लबचे प्रशिक्षक ट्रेव्हर यांनी सांगितले.
केरळा ब्लास्टर्स संघाचा मालक असलेल्या सचिन तेंडुलकरच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, असे विचारल्यावर ट्रेव्हर म्हणाले, ‘‘सचिन तेंडुलकर हा स्वत: खेळाडू आहे. त्यामुळे आमच्याकडून त्याच्या फार अपेक्षा नाहीत. पण चांगली कामगिरी करण्यासाठी त्याच्याकडून कायम प्रोत्साहन आम्हाला मिळत असते. सचिन हा महान क्रिकेटपटू असल्यामुळे संघातील खेळाडूंमध्ये त्याच्याविषयी नितांत आदर आहे. काही वेळा खेळाडूंकडे जाऊन तो त्यांना मार्गदर्शन करत असतो.’’
ते म्हणाले, ‘‘भारतात आधुनिक सोयीसुविधांची वानवा असली तरी त्या सुधारण्यासाठी आता सर्वानी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. त्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रानेही पुढाकार घ्यायला हवा. त्याचबरोबर विविध क्लब्सनेही खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा पुरवायला हव्यात. भारतीय खेळाडू तंदुरुस्तीच्या बाबतीत कमी पडतात, हा समज चुकीचा आहे. मी आय-लीगमधील ईस्ट बंगाल क्लबशी गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. भारतीय खेळाडू परदेशी खेळाडूंच्या तुलनेने तंदुरुस्त आहेत, असे माझे निरीक्षण आहे. केरळा ब्लास्टर्स संघात जवळपास १७ खेळाडू भारतीय असून ते मैदानावर कठोर मेहनत घेतात.’’