वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेपूर्वी ‘अ’ संघाविरुद्धचा तीनदिवसीय सामना रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. खेळाडू अधिक वेळ नेट सरावाला देण्यास इच्छुक असल्याने हा सराव सामना रद्द करण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवल्याचे समजते.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. भारतीय संघ १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत पर्थमध्येच ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार होता. भारत ‘अ’ संघ सध्या ऑस्ट्रेलियातच असून यजमान देशाच्या ‘अ’ संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि काही वरिष्ठ खेळाडूंना नेटमधील सरावासाठी अधिक वेळ द्यायचा असल्याचे समजते. रोहित शर्माचा संघ न्यूझीलंडकडून झालेल्या मालिका पराभवानंतर ऑस्ट्रेलियात जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सलग तिसरी कसोटी मालिका जिंकण्याचे ध्येय बाळगलेल्या भारतीय संघावर यावेळी अतिरिक्त दडपण असणार आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक राखण्यासह जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळवण्याचे भारतासमोर आव्हान आहे.