Harmanpreet Kaur Press Conference: नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार रंगला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. भारताने या सामन्यातील पहिल्या डावात २९८ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २९९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला दमदार सुरुवात मिळाली होती. पण शेवटी दिप्ती शर्माच्या फिरकीत दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अडकले आणि भारतीय संघाने हा सामना ५२ धावांनी जिंकला. दरम्यान पत्रकार परिषदेत कर्णधार हरमनप्रीत कौर काय म्हणाली? जाणून घ्या.

चांगला खेळ केल्यानंतर कौतुक होतं पण, गमावल्यानंतर खेळाडूंवर टीका होते. यावर आपली प्रतिक्रिया देताना हरमनप्रीत कौर म्हणाली, “टीका होणं हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. आयुष्यात समतोल राखण्यासाठी टीका होणं खूप आवश्यक आहे. जर सगळं काही ठीक सुरू असेल तर ओव्हर कॉन्फिडन्स वाढतो.”असं हरमनप्रीत कौर म्हणाली.

नवी मुंबईत वर्ल्डकप आला आणि आम्हाला वाटलं आता हीच ती वेळ असं म्हणताना हरमनप्रीत कौर म्हणाली, “जेव्हा आम्हाला कळालं की, आमचे सामने डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहेत, हे ऐकताच आम्हाला आनंद झाला. कारण आम्ही इथे नेहमीच चांगला खेळ केला आहे. आम्ही म्हणालो, आम्ही आता घरी आलो आहोत, आता नवी सुरुवात करू.

भारताने गेल्या काही वर्षांत सेमीफायनल आणि फायनलमध्येही प्रवेश केला होता, पण एकदाही ट्रॉफी उंचावता आली नव्हती. याबाबत बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली, “आम्ही गेल्या काही वर्षांपासून चांगलं क्रिकेट खेळत आहोत. पण आम्हाला एक मोठी स्पर्धा जिंकायची होती. आम्ही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. आज आम्हाला तो क्षण जगण्याची संधी मिळाली आहे. हे शब्दात कसं मांडू हेच कळत नाही. पण मला माझ्या संघावर खूप अभिमान आहे.” हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिलाच वर्ल्डकप विजय ठरला. विजयानंतर भारतीय खेळाडूंनी रात्रभर विजयाचा जल्लोष केला.