वन-डे आणि टी-२० मालिका पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत हार्दिक पांड्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवत मालिकावीराचा किताब पटकावला. त्याच्या खेळीने प्रभावित झालेला ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने हार्दिकला भारताच्या कसोटी संघातही स्थान देण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर एका भारतीय चाहत्याने शेन वॉर्नला टॅग करत भारताने हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मोहीम सुरु करायला हवी असं म्हटलं. ज्याला उत्तर देताना शेन वॉर्नने सकारात्मक प्रतिसाद देत पांड्या भारताच्या कसोटी संघात असायला हवा असं म्हटलं आहे.

अनेक भारतीय चाहत्यांना पांड्याने कसोटी मालिकेत खेळायला हवं असलं तरीही विराट कोहलीने हार्दिक पांड्या सातत्याने गोलंदाजी करायला लागल्याशिवाय त्याला कसोटी संघात स्थान मिळणं शक्य नसल्याचं म्हटलंय. फक्त फलंदाज म्हणून हार्दिकला संघात स्थान मिळणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे.