नोवी साद (सर्बिया) : युवा जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील भारताची वैयक्तिक सुवर्णपदकाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. सर्बिया येथे झालेल्या २३ वर्षांखालील या स्पर्धेत हंसिका लांबा आणि सारिका मलिक यांना अखेरीस रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, भारताने या स्पर्धेत एकूण सात पदके जिंकताना सर्वसाधारण जेतेपद पटकावले.

हंसिकाला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत जपानच्या हरुना मोरिकावाकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागला. अंतिम लढतीच्या पहिल्या फेरीत हंसिकाने निराशाजनक खेळ केला. मोरिकावाने तिला मॅटवर पाडत पहिला गुण कमावला. त्यानंतर नकारात्मक खेळामुळे हंसिकाने आणखी गुण गमावले. ती ०-३ अशी पिछाडीवर गेली. त्यानंतर तिने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण मोरिकावाने बचाव भक्कम राखत विजय नोंदवला आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले.

दुसरीकडे, गतवर्षी २० वर्षांखालील आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या सारिकाला आता युवा जागतिक स्पर्धेतही पदकाचा रंग बदलता आला नाही. तिला गतवर्षी या स्पर्धेत राैप्यकमाई करणाऱ्या जपानच्या रुका नातामीला सामोरे जावे लागले. अंतिम लढतीच्या पहिल्या फेरीत नातामीच्या नकारात्मक खेळामुळे सारिकाला पहिला गुण मिळाला. त्यानंतर सारिकाने अधिक ताकदीने खेळताना नातामीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु नातामीने चपळाई दाखवत सारिकाला मॅटच्या कोपऱ्यावर नेत दोन गुण मिळवले आणि २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर तिने ही आघाडी राखत सुवर्णपदकाची कमाई केली.

एकूण सात पदके

या स्पर्धेत हंसिका आणि सारिकाने रौप्यपदक, तर निशू (५५ किलो), नेहा शर्मा (५७ किलो), पुलकित (६५ किलो), श्रृष्टी (६८ किलो) आणि प्रिया मलिक (७६ किलो) यांनी कांस्यपदक मिळवले. त्यामुळे भारताने या स्पर्धेची सात पदकांसह सांगता केली. भारतीय संघ सर्वाधिक १२५ गुणांसह सर्वसाधारण जेतेपदाचा मानकरी ठरला. अमेरिकेने १०२ गुणांसह दुसरे, तर जपानने ९२ गुणांसह तिसरे स्थान मिळवले.