scorecardresearch

इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धा : प्रियांशू मुख्य फेरीत; साईप्रणीत अपयशी

साईप्रणीतला मलेशियाच्या शीम जून वेईकडून १८-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.

इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धा : प्रियांशू मुख्य फेरीत; साईप्रणीत अपयशी
प्रियांशू राजावत (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

जाकार्ता : दोन शानदार विजयांसह भारताच्या प्रियांशू राजावतने इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेच्या (सुपर ५०० दर्जा) मुख्य फेरीत प्रवेश केला. पुरुष विभागातच बी. साईप्रणीत मात्र मुख्य फेरीपासून दूरच राहिला.

गेल्या वर्षी सुपर १०० मालिकेतील ओडिशा खुल्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या २० वर्षीय प्रियांशूने डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेनसेनचा २१-१०, १३-२१, २१-१३ असा आणि नंतर फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोव्हचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला. साईप्रणीतला पात्रता फेरीचा दुसरा अडथळा पार करता आला नाही. पहिल्या फेरीत त्याने इंडोनेशियाच्या इक्शन लिओनाडरे इमॅन्युएल रुम्बेवर २१-१८, ९-२१, २१-१५ अशी मात केली होती. मात्र, पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत साईप्रणीतला मलेशियाच्या शीम जून वेईकडून १८-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.

पुरुष दुहेरीत किरण जॉर्ज-मिथुन मंजुनाथ, मिश्र दुहेरीत बी. सुमित रेड्डी-अश्विनी पोनप्पा जोडीला मुख्य फेरी गाठता आली नाही. मिश्र दुहेरीतच रोहन कपूर-एन. सिक्की रेड्डी यांनी तैवानच्या पो ली वेई-चँग चिंग हुई जोडीचा २१-१५, २१-१८ असा पराभव करून मुख्य फेरीत स्थान मिळवले.

मलेशिया व भारत खुल्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या अकाने यामागुचीने या स्पर्धेतून माघार घेतली, तर आकर्षी कश्यपला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 05:05 IST

संबंधित बातम्या