फिफा विश्वचषकातील रविवारी झालेले सामने सट्टेबाजांच्या अपेक्षेप्रमाणे झाले. बेल्जियमने रशियाला रोखले तर अल्जेरियाने दक्षिण कोरियाला. पोर्तुगाल आणि अमेरिका यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्याने सट्टेबाजारात या दोन्ही संघाच्या बाजूने सट्टा खेळणाऱ्या पंटर्सना निराश व्हावे लागले. भारतीय सट्टाबाजारात सामना अनिर्णित राहिला तर फारसा भाव लावला जात नाही. मात्र आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात अनेक अधिकृत साइटस् सामना अनिर्णित राहिला तर असा विशेष भावच देऊ करतात. हा भाव काही वेळा प्रत्येक संघाला दिलेल्या भावापेक्षा बरा असतो. भारतीय सट्टाबाजारात अद्याप विजय आणि पराभवालाच अधिक महत्त्व आहे. विश्वचषकातील बाद फेरीत धडक मारणाऱ्या संघासाठीही आता सट्टा लावला जाऊ लागला आहे. सध्या सट्टेबाजारात ब्राझील, जर्मनी, अर्जेटिना, फ्रान्स, नेदरलँड, चिली, बेल्जियम, कोलंबिया, इटली, उरुग्वे हे दहा संघ आघाडीवर आहेत. मंगळवारी होणाऱ्या सामन्यांपैकी इटली आणि उरुग्वे यांच्यातील लढत सट्टेबाजारात चर्चेचा विषय आहे. त्यामुळे दोन्ही संघांना समान भाव देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारातही हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे भाकीत वर्तविले आहे. कोलंबिया आणि जपान यांच्यातील सामन्यात सट्टेबाजांचा कौल कोलंबियाच्या दिशेने आहे. थॉमस म्युलर, लिओनेल मेस्सी, नेयमार, रॉबिन व्हान पर्सी हे गोलकर्ते आपली जागा टिकवून आहेतच. ख्रिस्तियानो रोनाल्डो फक्त भारतीय सट्टेबाजारात टिकून आहे.
आजचा भाव :
कोस्टा रिका इंग्लंड
सव्वा रुपया (७/२) ६५ पैसे (६/७)
इटली आणि उरुग्वे – समानभाव – पावणे दोन रुपये (९/५)
ग्रीस आयव्हरी कोस्ट
अडीच रुपये (१४/५) ९५ पैसे (११/१०)
जपान कोलंबिया
दीड रुपया (११/५) ६० पैसे (७/५)
कप-शप : इथेच टाका तंबू..गावाबाहेरच्या माळरानावर दिसणारी पालं आपल्या परिचयाची आहेत. कामाच्या निमित्ताने गावात आलेल्या माणसांचा हा आसरा. तात्पुरत्या राहण्याची ही पद्धत थेट दूर ब्राझीलमध्येही पाहायला मिळते आहे. मात्र ही मंडळी कामासाठी आलेली नाहीत. त्यांच्या आगमनाचे कारण आहे, विश्वचषकात खेळणाऱ्या नेदरलँड्सचं समर्थन करणं. विश्वचषकाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांचे ब्राझीलमध्ये आगमन झालं आहे. चाहत्यांची संख्या हजारांमध्ये असल्यानं प्रत्येकाला चांगल्या दर्जाचं हॉटेल मिळणं कठीण आहे, हे लक्षात घेऊनच नेदरलँड्सच्या चाहत्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. नेदरलँड्सचा संघ साओ पावलो शहरात आहे. या शहरापासून नजीकच निसर्गरम्य परिसरात त्यांच्या चाहत्यांनी चक्क तंबूच टाकले आहेत. अत्याधुनिक स्वरूपाच्या या तंबूत राहण्याची आणि जेवण करण्याची व्यवस्था आहे. हे तंबू मोकळ्या जागेवर उभारण्यात आल्याने त्यासाठी कोणालाही शुल्क देण्याची गरज नाही. तसेच विशिष्ट दिवसात खोली सोडण्याची अटही नाही. खुल्या आभाळात एकाच रंगाच्या, एकाच आकाराच्या तंबूंमुळे या परिसराला नेदरलँड्सच्या लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. नेदरलँड्सचा संघ तूर्तास तरी दमदार आगेकूच करत आहे. त्यामुळे हे तंबू आणखी काही दिवस तरी स्थिरावण्याची शक्यता आहे.
शुट आऊट :विश्वचषकातील सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी स्टेडियममध्ये हजर राहणारे अनेक चाहते कल्पक वेशभूषा साकारून आपली उपस्थिती खास करताना आणि आपल्या देशाचे समर्थनही करतात. बेल्जियमच्या या चाहत्याने तहान भागवण्यासाठी चक्क आपल्या हॅल्मेटलाच ही व्यवस्था केली आहे.