|| प्रशांत केणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुपम गोस्वामी, प्रो कबड्डीचे समन्वयक

मुंबई : प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम भारतातच आयोजनाची आमची योजना आहे. खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिस्थितीचा आढावा घेऊन संघ आणि अन्य भागधारकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असे मत प्रो कबड्डीचे समन्वयक आणि मशाल स्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम गोस्वामी यांनी व्यक्त केले.

‘‘बरेच क्रीडा प्रकार पुन्हा सुरू होतील, याची क्रीडारसिक आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रो कबड्डीसुद्धा परतेल आणि कबड्डी चाहत्यांच्या पसंतीस उतरेल, असा मला विश्वास आहे. सरकारच्या प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन करून गुणवत्ता जोपासना, तंदुरुस्ती आणि प्रो कबड्डीची तयारी विविध स्तरांवर सुरूच आहे,’’ अशी माहिती गोस्वामी यांनी दिली. प्रो कबड्डीच्या अनुषंगाने विविध मुद्दय़ांवर गोस्वामी यांच्याशी केलेली खास बातचीत-

’ प्रो कबड्डीसह अनेक व्यावसायिक कबड्डी स्पर्धाना करोनाचा फटका बसला आहे, याचे तुम्ही कसे विश्लेषण कराल?

करोनाचा संपूर्ण क्रीडाव्यवस्थेला फटका बसला आहे. सध्या टीव्हीवर प्रक्षेपित होणारे खेळ आणि लीग यांचे पुनर्वसन होत आहे. कबड्डी संपर्काचा क्रीडा प्रकार असल्याने त्याच्या पुनर्वसनासासाठी अनेक घटकांचे आव्हान आहे. क्रिकेट आणि फुटबॉल स्पर्धासाठी प्रेक्षकांविना स्पर्धा घेत टेलिव्हिजन किंवा ओटीटीवरील प्रेक्षकसंख्येत वाढ करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. त्यामुळे प्रो कबड्डीच्या पुनरागमनासाठीही काही बदल अपरिहार्य आहेत.

’ प्रो कबड्डीचे एक वर्ष वाया गेले आहे. याचा संघमालक, जाहिरातदार आणि अन्य आर्थिक घटकांवर कोणता परिणाम होईल?

गेल्या काही वर्षांत प्रो कबड्डीने देशात ‘आयपीएल’ ट्वेन्टी-२० क्रिकेटनंतर दुसऱ्या क्रमांकाची लीग हा दर्जा प्राप्त केला आहे. त्यामुळे प्रो कबड्डी जोशात पुनरागमन करील. त्यामुळे जाहिरातदार आणि पुरस्कर्तेही पाठीशी राहतील, यावर आमचा विश्वास आहे.

’ १२ संघांसह वर्षांतील तिमाही व्यापणारी प्रो कबड्डी पुन्हा प्रेक्षकांमध्ये रुजेल का?

१२ संघांसह तीन महिन्यांची प्रो कबड्डी लीग जनमानसात तीन हंगामांमध्ये सवयीची झाली आहे. सातव्या हंगामात ३२ कोटी, ८० लाख प्रेक्षकसंख्या लीगने कमावली आहे, तसेच ७० अब्जांहून अधिक मिनिटे ती पाहिली गेली आहे. भारतात क्रिकेटला अग्रस्थान असले तरी अन्य क्रीडा प्रकारांमध्ये प्रो कबड्डीने स्वत:चे अग्रस्थान अधोरेखित केले आहे. त्यामुळे प्रो कबड्डी पुन्हा रुजवणे कठीण नसेल.

’ करोनाच्या कालखंडाचा कबड्डीच्या ऑलिम्पिक मोहिमेला धक्का बसला आहे का?

कबड्डीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा, यासाठी देशातील चाहत्यांसह क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि माजी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोडसुद्धा उत्सुक आहेत, परंतु करोनाचा प्रभाव यावरही पडणे स्वाभाविक आहे.

’ विश्वचषक कबड्डीला अजून किती प्रतीक्षा करावी लागेल?

विश्वचषक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाची कोणत्याही क्रीडा प्रकाराच्या विकासात महत्त्वाची भूमिका असते. बांगलादेशमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही अन्य देशांचा खेळ सुधारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कबड्डीच्या आंतराष्ट्रीयीकरणाकडे आम्ही गांभीर्याने पाहात आहोत.

’ करोनाच्या साथीचा क्रीडा वाहिन्यांवर कोणता परिणाम झाला आहे?

गेल्या वर्षभरात प्रेक्षकांच्या मानसिकतेतही बदल झाला आहे. ओटीटी आणि डिजिटल माध्यमे अधिक सक्षम झाली आहेत. करोनाच्या सुरुवातीच्या काळात नव्या सामन्यांची कमतरता होती, आता ती भेडसावत नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview of the week the eighth season of the pro kabaddi league is in india akp
First published on: 19-04-2021 at 00:20 IST