पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रकुल २०३० स्पर्धेच्या आयोजनासाठी देशाच्या बोलीला औपचारिक मान्यता देण्याचा निर्णय घेतला. अंतिम बोली सादर करताना भारताला पदके अपेक्षित असलेल्या सर्व खेळांचा या स्पर्धेत समावेश करण्याचा आग्रह धरण्याचा मनोदयही या सभेत व्यक्त करण्यात आला.
यजमानपदासाठी यापूर्वीच अहमदाबाद शहराने आपली रुची दाखवली आहे. त्यामुळे या शहरालाच पसंती मिळणार हे निश्चित आहे. मात्र, नजिकच्या काळात बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी गुजरातचेच नाव पुढे येत असल्यामुळे अंतिम बोली लावण्यापूर्वी नवी दिल्ली आणि भुवनेश्वर शहरांचाही विचार करण्याचाही निर्णय या सभेत घेण्यात आला. अर्थात, ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी उच्च पातळीवर प्रयत्न सुरू असून, ऑलिम्पिकसाठी अहमदाबाद शहरालाच मुख्य केंद्र करण्यात येणार असल्यामुळे राष्ट्रकुलच्या माध्यमातून उपलब्ध केंद्रांची चाचणी करण्याची संधी भारताला मिळणार आहे, असे सांगून राष्ट्रकुल स्पर्धा अहमदाबाद येथेच घेतली जाईल, असेच मानले जात आहे. यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन ही ऑलिम्पिक यजमानपदासाठी एक प्रकारे भारताची परीक्षाच असेल. बहुविध खेळांचा समावेश असलेल्या स्पर्धांचे आयोजन आम्ही करू शकतो हे दाखवून देण्याचा भारताचा हा एक प्रयत्न मानला जात आहे.
मात्र, यावर ‘आयओए’ अध्यक्ष पी.टी.उषा यांनी थेट भाष्य करणे टाळले. यजमान म्हणून अहमदाबादच असू शकेल असे नाही. आमच्याकडे नवी दिल्ली आणि भुवनेश्वर शहरातही चांगल्या सुविधा आहेत, असे उषा म्हणाल्या. या स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीतून कॅनडाने माघार घेतल्यामुळे भारताला यजमानपद मिळण्याची शक्यता बळावली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या बोलीला मान्यता देताना ‘आयओए’ने भारताला हमखास पदक अपेक्षित असलेल्या सर्व खेळांचा समावेश करण्याची योजना आखली आहे. यामध्ये नेमबाजी, कुस्ती, हॉकी, बॅडमिंटन या आगामी स्पर्धेतून वगळलेल्या खेळांसह कबड्डी आणि खो-खो, तसेच आतापर्यंत या खेळाचा भाग नसलेल्या तिरंदाजी या खेळांच्या समावेशासाठी आग्रह धरला जाईल, असे ‘आयओए’चे सहसचिव कल्याण चौबे यांनी सांगितले.
राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे संचालक डॅरेन हॉल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अलीकडेच अहमदाबाद शहराची पाहणी केली असून, गुजरात सरकारशी देखील चर्चा केली आहे. यानंतरही त्यांचे एक मोठे शिष्टमंडळ या महिनाअखेरीस भारतात येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी राष्ट्रकुलमध्ये
भारताने २०१० मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १७ खेळांतील २१ क्रीडा प्रकारात स्पर्धा झाली होती. तेव्हा कबड्डीचा प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश करण्यात आला होता. अर्थात कबड्डीचा अजून या खेळात समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतर २०१८ मध्ये १९, २०२२ मध्ये २० खेळांचा समावेश होता. पुढील वर्षी ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत मात्र १० खेळांचाच समावेश करण्यात आला आहे. आयोजनाचा वाढता खर्च लक्षात घेऊन स्कॉटलंड या आयोजक देशाने हा निर्णय घेतला. यातून कुस्ती, हॉकी, नेमबाजी, बॅडमिंटन, ट्वेन्टी-२० क्रिकेट, स्क्वॉश, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, तालबद्ध जिम्नॅस्टिक, ट्रायथलॉन, रग्बी सेव्हन या खेळांना वगळण्यात आले आहे.
तीन गटातून ठरतात खेळ
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळांचा समावेश करताना तीन गटांचा समावेश असतो. यात पहिल्या गटात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या मुख्य खेळांचा, नंतर दुसरा गट यजमान देशांच्या पसंतीचा, तर तिसरा गट अतिरिक्त खेळांचा असतो. भारतातील २०३० राष्ट्रकुल स्पर्धा ही सर्वसमावेशक खेळांची असेल, असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.