भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या विरोधात काही खेळाडू जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करायला बसले आहेत. गेले ११ दिवस याविरोधात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी आज या आंदोलनस्थळी भेट घेतली. गेल्या आठवड्यात पी टी. उषा यांनी या आंदोलकांवर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्या या भेटीवरून क्रीडा क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यासोबत पी. टी. उषा यांनी चर्चा केली. या भेटीनंतर बजरंग पुनिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. “पी. टी. उषा या आमच्यासोबत असून त्या आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत”, अशी प्रतिक्रिया बजरंग पुनिया यांनी दिली.

तसंच, “मी आधी खेळाडू आहे, आणि मग इतर कोणी असंही पी. टी. उषा म्हणाल्या”, असंही बजरंग पुनिया यांनी सांगितलं. या प्रकरणात त्या लक्ष घालणार असून लवकरात लवकर ही समस्या सोडवणार आहेत. तसंच, ब्रिजभुषण सिंह तुरुंगात जात नाही तोवर आम्ही इथून हटणार नाही, असंही पुनिया यांनी पुढे स्पष्ट केलं.

पी. टी. उषा यांनी काय टीका केली होती?

“खेळाडूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे बेशिस्तपणाचे असून त्यामुळे भारताची प्रतिमा खराब होतेय”, असं पी. टी. उषा गेल्या आठवड्यात म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली. आंदोलक खेळाडूंनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महिला खेळाडू असूनही त्या इतर महिला खेळाडूंना समजून घेत नाहीत. आम्ही लहानपणापासून त्यांना फॉलो करतो आहोत. त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. येथे कुठे बेशिस्तपणा आहे? आम्ही येथे शांतपणे बसलो आहोत”, अशी प्रतिक्रिया साक्षी मलिक यांनी माध्यमांना दिली होती.