शुभमन गिलचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेलने दिलेल्या भक्कम साथीच्या जोरावर कोलकात्याने पंजाबवर ७ गडी राखून मात केली. या विजयासह कोलकाताचे मात्र बाद फेरीसाठीचे आव्हान अजूनही टिकून आहे. पण या पराभवासह पंजाबचे IPL 2019 मधील आव्हान संपुष्टात आले.

या सामन्यातील पराभवाबाबत आणि स्पर्धेबाबत बोलताना अश्विन म्हणाला की आम्ही खरा सामना पॉवरप्ले च्या षटकांमुळे पराभूत झालो. पूर्ण स्पर्धेत पॉवर प्ले म्हणजेच पहिल्या ६ षटकांमध्ये आमच्या संघाची कामगिरी हवी तशी होऊ शकली नाही. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोंन्ही आघाड्यांवर आम्ही पॉवर प्ले मध्ये अपयशी ठरलो. गेल्या हंगामात ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या दोघांनी पॉवर प्ले मध्ये तुफान फलंदाजी करून आमच्या संघाला चांगली कामगिरी करून दिली होती. पण या हंगामात त्यांच्याकडून दडपणामुळे तशी कामगिरी होऊ शकली नाही.

पुढच्या वर्षी आम्हाला पॉवर प्ले मधील खेळीवर लक्ष देणे गरजेचे आहे. कारण यंदाच्या हंगामात आमच्या संघाच्या पराभवाचे बहुतांश कारण हे पॉवर प्ले मधील आमची खराब कामगिरी हेच आहे. आम्ही जे सामने जिंकलो ते सामने आम्ही मधल्या काहजी षटकांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर जिंकले. आणि जे सामने अटीतटीचे झाले ते आम्ही शमी किंवा करन याच्या गोलंदाजीच्या बळावर जिंकू शकलो, असेही अश्विनने स्पष्ट केले.

दरम्यान, १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि ख्रिस लिन जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करुन दिली. अँड्रू टायने स्वतःच्या गोलंदाजीवर लिनचा झेल पकडत कोलकात्याला पहिला धक्का दिला. लिनने ४६ धावा केल्या, त्याचं अर्धशतक ४ धावांनी हुकलं. लिन माघारी परतल्यानंतरही गिलने एक बाजू भक्कमपणे लावून धरत संघाचं आव्हान कायम राखलं. यादरम्यान गिलने आपलं अर्धशतकही साजरं केलं. त्याने नाबाद ६५ धावांची खेळी केली.

यानंतर रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडण्यात पंजाबला यश आलं खरं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा गिल-कार्तिक जोडीने पूर्ण करत पंजाबच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं. पंजाबकडून मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन आणि अँड्रू टाय यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने घरच्या मैदानावर १८३ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या षटकापासून भेदक मारा करत पंजाबच्या धावगतीवर अंकुश ठेवला. मात्र अखेरच्या षटकात मनदीप सिंह, सॅम करन, निकोलस पूरन यांनी फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांना तात्काळ माघारी धाडण्यात कोलकात्याला यश आलं. यानंतर निकोलस पूरन आणि मयांक अग्रवाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. या भागीदारीमुळे पंजाबचा डाव सावरला, मात्र नितीश राणाने पूरनचा अडथळा दूर करुन पंजाबला तिसरा धक्का दिला.

यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत कोलकात्याला चांगली झुंज दिली. सॅम करनने अर्धशतकी खेळी करत नाबाद ५५ धावा केल्या. कोलकात्याकडून संदीप वॉरियरने २ तर हॅरी गुर्ने, आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. पंजाबचा एक फलंदाज धावबाद झाला.