राजस्थानने दिलेल्या छोटेखानी लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करत, दिल्लीने गुणतालिकेत पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. घरच्या मैदानावर खेळताना राजस्थान रॉयल्सवर ५ गडी राखून मात करत दिल्लीने साखळी फेरीचा अखेर विजयाने केला आहे. याचसोबत राजस्थान रॉयल्सचं या पर्वातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी दिल्लीला चांगली झुंज दिली, मात्र त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरले. ऋषभ पंतने अर्धशतक करत पुन्हा एकदा आपली छाप पाडली. राजस्थानकडून इश सोधीने दिल्लीच्या सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडत चांगली सुरुवात केली होती. त्याला श्रेयस गोपाळनेही चांगली साथ दिली. मात्र मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी, रियान परागच्या झुंजार अर्धशतकी खेळाच्या जोरावर राजस्थानने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ११५ धावांपर्यंत मजल मारली आहे. आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा रियान सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने ९ बाद ११५ पर्यंत मजल मारली. सामन्यात रहाणेने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे मोठा फटका खेळताना स्वस्तात माघारी परतला. सलामीवीर लिआम लिव्हिंगस्टोन याने चांगली सुरुवात केली होती, पण १ चौकार आणि १ षटकार खेचत १४ धावांवर तो त्रिफळाचीत झाला आणि राजस्थानला दुसरा धक्का बसला. लगेचच संजू सॅमसनही धावचीत झाला. महिपाल लोमरोर आणि संजू सॅमसन यांच्यात काहीसा गोंधळ झाला आणि त्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. त्याने ५ धावा काढल्या. नव्या दमाचा महिपाल लोमरोर याला मोठी खेळी करण्याची चांगली संधी होती, पण तो बाहेरच्या चेंडूला बॅट लागल्याने झेलबाद झाला. त्याने ८ धावा केल्या. त्याआधी दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राची हॅटट्रीक घेण्याची संधी हुकली. श्रेयस गोपाल आणि पाठोपाठ स्टुअर्ट बिन्नी असे २ चेंडूत अमित मिश्राने २ बळी टिपले. गोपालने १२ धावा केल्या, तर बिन्नी पाहिल्याचे चेंडूवर बाद झाला. त्याला हॅटट्रिकची संधी होती. तिसऱ्या चेंडूवरदेखील मिश्राने टाकलेला चेंडू हवेत उंच उडाला, पण ट्रेंट बोल्टने झेल सोडला. कृष्णप्पा गौतम मोठा फटका खेळताना माघारी परतला. त्याने एका चौकारासह ६ धावा केल्या. आजच्या सामन्यात संधी मिळालेला ईश सोधी ६ धावा करून बाद झाला. रियान परागने मात्र एकतर्फी खिंड लढवून ४९ चेंडूत ५० धावा केल्या.