नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान गुरुवारी मोडीत काढत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याने आता दिल्ली आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात शनिवारी रात्री होणाऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकासाठी झुंज रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली कॅपिटल्सने सलग तीन सामने जिंकल्यानंतर त्यांची विजयी घोडदौड मुंबईने रोखली होती. त्यामुळे ९ सामन्यांत दिल्लीचे पाच विजयांसह १० गुण झाले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पंजाबनेही ९ सामन्यांत पाच विजय मिळवून १० गुणांनिशी चौथे स्थान पटकावले आहे. आता शनिवारी उभय संघांमध्ये होणाऱ्या सामन्यानंतर विजयी संघ तिसऱ्या क्रमांकावर मजल मारणार आहे.

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर चाहत्यांची मिळणारी साथ आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंग तसेच सल्लागार सौरव गांगुली यांची रणनीती दिल्ली कॅपिटल्ससाठी तारणहार ठरते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने तीन दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सला सहज पराभूत केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. ख्रिस गेलची तुफानी, त्याला मिळणारी लोकेश राहुल आणि डेव्हिड मिलर यांची साथ यामुळे पंजाबने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये बऱ्यापैकी मजल मारली आहे.

श्रेयर अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांना चार सामन्यांत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध एकमेव विजय ‘सुपर-ओव्हर’मध्ये मिळवता आलेला आहे. विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातून स्थान न मिळालेल्या ऋषभ पंतकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या असतील.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मधली आणि तळाची फलंदाजी गडगडल्यामुळे दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा दिल्लीच्या संघाला असेल.

‘‘घरच्या मैदानांवर विजय मिळवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने आम्ही गमावलेल्या तिन्ही सामन्यांत आम्हाला नाणेफेकीचा कौल जिंकता आलेला नव्हता. दिल्लीच्या धिम्या गतीच्या खेळपट्टीवर आम्ही कसून सराव केला आहे,’’ असे श्रेयस अय्यरने सांगितले.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १

संघ

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत, कॉलिन इन्ग्राम, किमो पॉल, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, अमित मिश्रा, कॅगिसो रबाडा, इशांत शर्मा, हनुमा विहारी, अंकुश बेन्स, ख्रिस मॉरिस, शेरफाने रुदरफोर्ड, जलाज सक्सेना, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नथू सिंग, बंडारू अय्यप्पा, कॉलिन मुन्रो, मनज्योत कालरा.

किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, मयांक अगरवाल, सर्फराझ खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, सॅम करन, अँड्रय़ू टाय, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, मोझेस हेन्रिक्स, वरुण चक्रवर्ती, हरप्रीत ब्रार, सिमरन सिंग, निकोलस पूरन, हार्डस विलोजेन, अंकित राजपूत, अर्शदीप सिंग, दर्शन नलकांडे, अग्निवेश अयाची.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 delhi capital versus kings xi punjab match preview
First published on: 20-04-2019 at 04:59 IST