मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ४० धावांनी मात करत आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपलं स्थान भक्कम केलं आहे. मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फलंदाजीदरम्यान हार्दिकने १५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान अखेरच्या कगिसो रबाडाच्या अखेरच्या षटकामध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळत सर्वांची वाहवा मिळवली.

सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना हार्दिक पांड्याने, धोनीलाही आपला ‘हेलिकॉप्टर शॉट’ आवडत असल्याचं सांगितलं आहे. “एखाद्या सामन्यात मी हेलिकॉप्टर शॉट खेळेन याची कल्पनाही केली नव्हती. नेट्समध्ये मी या फटक्याचा सराव करत होतो. मी एकदा धोनीच्या रुमवर जाऊन, त्याला माझा फटका आवडला का असं विचारलं, तो लगेच हो असं म्हणाला.” दिल्लीविरुद्ध सामन्यात हार्दिकला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

अवश्य वाचा – Video : कोटलाच्या मैदानावर उतरलं हार्दिकचं हेलिकॉप्टर, पोलार्डनेही केलं कौतुक

दरम्यान, मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने दिल्लीच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र राहुल चहरने दिल्लीच्या डावाला खिंडार पाडलं. धवन आणि पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या आक्रमणाची धार धारदार करत दिल्लीचा बॅकफूटला ढकललं. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, कॉलिन मुनरो हे फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेरच्या फळीत अक्षर पटेल आणि ख्रिस मॉरिस यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दिल्लीसमोरचं आव्हान हे अशक्यप्राय अवस्थेत गेलं होतं. अखेरीस मुंबईने धावांनी विजय मिळवत गुणतालिकेतलं दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. मुंबईकडून राहुल चहरने ३, जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले. त्यांना लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.